अखेर वंडर्सपार्कच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर वंडर्सपार्कच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा
अखेर वंडर्सपार्कच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा

अखेर वंडर्सपार्कच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २९ : नवी मुंबई महापालिकेने तयार केलेल्या वंडर्स पार्कमध्ये बसवण्यात आलेल्या नवीन खेळण्यांच्या लोकार्पणाचा मुहूर्त अखेर महापालिका प्रशासनाला सापडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमासाठी महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांना हिरवा कंदील दर्शवला आहे. मंगळवारी (ता. ३०) या वंडर्सपार्कमधील खेळण्यांसहीत इतर दोन प्रकल्पांचेही लोकार्पण आणि एका प्रकल्पाचे भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते आभासी पद्धतीने पार पडणार आहेत.
नेरुळ येथे महापालिकेने जगभरातील सात जागतिक आर्श्चर्यांच्या प्रतिकृतींनी उभारलेल्या वंडर्स पार्कमधील खेळणी जुनी आणि कालबाह्य झाल्याने बदलण्याचे काम हाती घेतले होते. तब्बल २६ कोटी ७४ लाख रुपये खर्च करून या ठिकाणी जुनी खेळणी बदलून त्याजागेवर अत्याधुनिक खेळणी बसवण्यात आली. जवळपास दोन महिनाभराआधीच हे काम पूर्णत्वास आले होते; परंतु महापालिकेला मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने त्याचे लोकार्पण रखडले होते. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी या उद्यानातील खेळण्यांचे लोकार्पण न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला होता. सत्ताधाऱ्यांसहीत विरोधकातील पक्षांच्या नेत्यांनीही आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे महापालिका प्रशासनावर दबाव वाढला होता. आयुक्त नार्वेकर यांना मुख्यमंत्र्यांची वेळ मिळवण्यात यश आल्याने अखेर खेळण्याच्या लोकार्पणाचा शासकीय कार्यक्रम आज पार पडणार आहे.

-------------------
टर्शरी ट्रीटमेंट प्लांटचेही उद्‍घाटन
वंडर्स पार्कमधील खेळण्यांच्या लोकार्पणासहीत महापालिकेने १५२ कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या टर्शरी ट्रीटमेंट प्लांट आणि २१ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या वाशीतील बहुउद्देशीय इमारतीचे लोकार्पण होणार आहे. तसेच सानपाडा येथे सुमारे ३० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या सेंट्रल लायब्ररीचे भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते आभासी पद्धतीने पार पडणार आहे.