
भिवंडीतून दोन गांजा तस्करांना अटक
भिवंडी, ता. ३० (बातमीदार) : कल्याण - भिवंडी महामार्गावर रांजनोली नाका उड्डाणपुलाखाली गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना भिवंडी गुन्हे शाखा घटक - २ च्या पथकाने अटक केली आहे. प्रसाद संतोष चौवले (२६, रा. कामतघर, भिवंडी) व किरण कोंडा (२७, रा. भिवंडी) अशी या तस्करांची नावे आहेत. या दोघांच्या विरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून ११ लाख ५४ हजार रुपयांचा ४१ किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे जण गांज्याची वाहनामधून वाहतूक करणार असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखा घटक -२ च्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रांजनोली ब्रिजखाली सापळा रचला. तेव्हा आरोपींना कारसह ताब्यात घेतले. त्यांच्या कारची झाडाझडती घेतली असता कारमध्ये ४१.१०० किलोग्रॅम वजनाचा गांजा, दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा ऐवज सापडला. पोलिसांनी कारसह एकूण ११ लाख ५४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत गांजा तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींवर कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.