
साखरा धरणात बुडून तरुणाचा मृत्यू
कासा, ता. ३० (बातमीदार) : डहाणूतील साखरा धरण येथे पोहण्यासाठी गेलेले तीन तरुण बुडाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी (ता. २९) सायंकाळी ही घटना घडली. यापैकी एकाचा बुडून मृत्यू झाला असून दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. वाचलेल्या दोघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अनिकेत पडवले असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे; तर देवजी पडवले आणि दीपक पडवले यांना वाचवण्यात स्थानिकांना यश आल आहे. अनिकेत, देवजी व दीपक हे तिन्ही तरुण डहाणूतील सरावली येथील रहिवासी आहेत. तिघांनीही वाणगाव येथून आपले आयटीआयचे शिक्षण पूर्ण केले आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास वाणगावच्या पूर्वेस असलेल्या साखरा येथील डॅममध्ये ते तिघेही पोहण्यासाठी गेले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोन तरुण बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्यासोबत असलेला तिसरा मित्रही धावून गेला. या वेळी पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाला; तर दोन जण बचावले आहेत. साखरा डॅम येथे मोठ्या प्रमाणावर सध्या तरुण मौजमस्तीसाठी येत असले तरी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचनाफलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. घटनेनंतर वानगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तरुणाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.