संभाव्य आपत्तीविरोधात प्रशासन सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभाव्य आपत्तीविरोधात प्रशासन सज्ज
संभाव्य आपत्तीविरोधात प्रशासन सज्ज

संभाव्य आपत्तीविरोधात प्रशासन सज्ज

sakal_logo
By

पनवेल, ता. ३१ (बातमीदार)ः पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीवर मात करण्यासाठी पनवेलमधील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. याच अनुषंगाने झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत प्रशासनाने पनवेल तालुक्यातील ७ गावांना पुराचा, तर ३ गावांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता असल्याने आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
पनवेलमध्ये सरासरी दरवर्षी २ हजार ८२४ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, गेली काही वर्षे पावसाळ्यात सातत्याने महापूर येऊन काही गावांमध्ये पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या घरांना पावसाळ्यात दरडीचा सर्वाधिक धोका असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पनवेल तालुका प्रशासनाने तालुक्यातील संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात पूर, दरडग्रस्त आणि खाडीकिनाऱ्यावरील गावांमध्ये ६०० हून अधिक कुटुंबे व साडेपाच हजार नागरिक पावसाळ्यात बाधित होत असल्याची आकडेवारी देण्यात आली आहे. तसेच पारगाव येथे सिडकोने केलेल्या भरावामुळे ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरत असल्याने स्थलांतरासाठी आपटा गावातील राजिप शाळा, करंजाडे, पारगाव डुंगी आणि दापोली भंगारपाडा, भिंगारीपाडा काळुंद्रे येथील शाळांमध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच खाडी किनाऱ्यावरील वडघर, करंजाडे, कच्छी मोहल्लातील नागरिकांच्या स्थलांतरासाठी वडघर, करंजाडे आणि पीर कमरअली शहा मनपा शाळा क्रमांक ६ ही पर्यायी ठिकाणी ठेवण्यात आली आहेत.
----------------------------------
‘या’ गावांना पुराचा धोका
गावांमध्ये पाणी शिरून नुकसान होणाऱ्या गावांमध्ये आपटा, चिपळे, करंजाडे, पारगाव-पारगाव डुंगी, दापोली-भंगारपाडा, पालीदेवद-शीलोत्तर रायचूर, भिंगारीपाडा-काळुंद्रे यांचा समावेश आहे; तर दरडग्रस्त गावांमध्ये चिंचवाडी धोदाणी, सतीचीवाडी मालडुंगे आणि धोदाणी या गावांचा समावेश आहे.
--------------------------------------------
पनवेलमध्ये तालुका आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत बैठक घेण्यात आली आहे. पूरग्रस्त गावांसंदर्भात सिडकोला कळवले आहे. तसेच नागरिकांच्या सुविधेसाठी एक जूनपासून नियंत्रण कक्ष सुरू होत आहे.
- विजय तळेकर, तहसीलदार, पनवेल