
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रयत्न
वसई, ता. १ (बातमीदार) : आगामी सणासुदीच्या कालावधीपूर्वी वसई विरार महापालिका पर्यावरणाविषयी सजग झाली आहे. यंदा सण, उत्सव साजरा करताना पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे. वसई विरार शहरात पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी पालिकेची लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवात पीओपी मूर्तींना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गणेशमूर्तींचे काम सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाकडून जागृती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहरातील जलप्रदूषण रोखण्यास मदत होईल, असा महापालिकेला विश्वास आहे.
वसई, विरार शहरात घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात होतो. यावेळी उत्सवाला उधाण येते. शहरातून गणेशमूर्तींची मिरवणूक काढली जाते. विसर्जनाला देखील उत्साह असतो; परंतु प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती विसर्जन केल्यावर जलप्रदूषण होते. शहरातील तलावाला प्रदूषणाचा विळखा पडतो व पर्यावरणाचा प्रश्न डोके वर काढतो. त्यामुळे यंदा गणेशोत्सवापूर्वीच वसई-विरार महापालिकेने पीओपी मूर्तींवर बंदी घातली आहे. गणेशोत्सवाला अजून तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी बाकी आहे. शहरातील मूर्तीकारांनी पीओपीच्या मूर्ती बनवण्यापूर्वीच प्रशासनाकडून जागृती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक मूर्ती बनवल्यानंतर त्याचे कोणते फायदे होतात, याचे महत्त्व आता मूर्तिकारांना सांगण्यात येणार आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांना प्रोत्साहित केले जाणार आहे. हा उत्सव संस्कृतीचा ठेवा जपत आहे. पर्यावरणपूरक मूर्तीचे विसर्जन केल्यावर तत्काळ मूर्ती विसर्जित होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी यंदा पावसाच्या आगमनापूर्वीच करण्यास सुरुवात केली आहे.
मूर्तिकारांना सूचना
वसई विरार महापालिकेने मूर्तिकारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पर्यावरणाला अनुकूल, पारंपरिक चिकणमातीमध्ये तुरटी मिसळून बनवलेल्या कच्चा मालापासून मूर्ती तयार करण्यात यावी. कोणताही विषारी, अजैविक कच्चा माल, तसेच प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी), प्लास्टिक, थर्माकोल यांचा वापर होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
प्रोत्साहनपर स्पर्धा
पर्यावरणपूरक गणेशोत्सव - २०२३ मध्ये विविध गणेश मंडळ यासोबतच घरगुती गणेशमूर्ती यांच्यासाठी वसई विरार महापालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा घेण्यात येणार आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षीस रक्कम, प्रमाणपत्र वाटप करून सन्मानित करण्यात येणार आहे. पर्यावरण समतोलासाठी प्रोत्साहन देता यावे, हा उद्देश बाळगला आहे.
पीओपीपासून बनवलेल्या गणेशमूर्तींवर बंदी असल्याने पर्यावरणपूरक मूर्ती खरेदी करण्यात याव्यात, तसेच पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने मोलाचे योगदान नागरिकांकडून अपेक्षित आहे. गणेशमूर्तिकरांनादेखील आवाहन करण्यात आले आहे. पर्यावरणाची काळजी घेऊन गणेशोत्सव साजरा करता येईल.
- डॉ. सागर घोलप, उपायुक्त, वसई विरार महापालिका
महापालिकेची मार्गदर्शक तत्त्वे :
- मूर्तीचे दागिने बनवण्यासाठी फक्त वाळलेल्या फुलांचे घटक, पेंढा इत्यादींचा वापर
- मूर्ती आकर्षक बनवण्यासाठी झाडांची नैसर्गिक उत्पादने, सामग्री
- मंडप सजावटीसाठी पेंढा, ऊसाच्या कांड्याचे पिरॅमिड साहित्यासाठी वापर
- मूर्ती रंगवण्यासाठी पर्यावरणास अनुकूल पाणी, जैवविघटनशील, नैसर्गिक रंग
- वनस्पतींपासून तयार होणारे रंग (फुले, साल, पुंकेसर, पाने, मुळे, बिया, फळे), खनिज किंवा रंगीत खडक अशा रंगाचा वापर.