२० दिवसांत ३९ आरोपी गजाआड

२० दिवसांत ३९ आरोपी गजाआड

नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून फरारी, तसेच विविध गुन्ह्यांत हवे असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. या पथकाने २० दिवसांमध्ये ३९ आरोपींना गजाआड केले असून त्यांच्या या कामगिरीमुळे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, तसेच सहपोलिस आयुक्त संजय मोहिते यांनी या पथकाचे विशेष कौतुक करून शाबासकीची थाप दिली आहे.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध गुह्यांतील आरोपी अटकेनंतर न्यायालयाकडून जामीन मिळवून बाहेर पडतात. मात्र, त्यानंतर खटल्याच्या कामकाजासाठी ते न्यायालयात हजर राहत नाहीत, तर काही आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुंगारा देऊन फरारी होतात. त्यामुळे संबंधित पोलिस ठाण्याकडून अशा फरारी आरोपींचा शोध घेण्यात येत असतो. मात्र, राहण्याचे ठिकाण, मोबाईल नंबर बदलून हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत असतात. त्यामुळे न्यायालयाकडून अशा आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले जाते. मात्र, तरीही आरोपी पोलिसांना गुंगारा देत असल्याने पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह पोलिस आयुक्त संजय मोहिते यांनी विशेष पथक स्थापन केले होते. या विशेष पथकाने २० दिवसांमध्ये नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्यांतील ३९ आरोपींचा शोध घेऊन त्यांना पुढील कार्यवाहीसाठी संबंधित पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
-------------------------------------------
विशेष पथकातील शिलेदार
या पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक निशांत धनावडे (खारघर पोलिस ठाणे), पोलिस उपनिरीक्षक प्रशांत कुंभार (रबाळे पोलिस ठाणे), हेड कॉन्स्टेबल विजय पाटील (तळोजा पोलिस ठाणे), जगदीश पाटील (एपीएमसी पोलिस ठाणे), पोलिस नाईक प्रवीण मेठे (पनवेल शहर पोलिस ठाणे), पोलिस कॉन्स्टेबल राहुल भोई (वाशी पोलिस ठाणे) या अधिकारी आणि अंमलदारांचा समावेश आहे.
-----------------------------------------
या विशेष पथकाने पकडलेल्या आरोपींमध्ये फसवणूक, मारामारी, चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी यांसारख्या गंभीर गुह्यांतील आरोपींचा समावेश आहे. यापुढील काळात हे पथक अशीच कामगिरी करेल.
- संजय मोहिते, सह पोलिस आयुक्त, नवी मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com