गोबरधन प्रकल्पामुळे ग्रामस्वच्छतेला चालना

गोबरधन प्रकल्पामुळे ग्रामस्वच्छतेला चालना

पालघर, ता. ६ (बातमीदार) : तालुक्यातील माकुणसार येथे सुरू करण्यात येणाऱ्या गोबरधन प्रकल्पामुळे ग्रामस्वच्छतेला चालना मिळणार आहे. या प्रकल्पामध्ये जनावरांचे शेण, स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, पिकांचे अवशेष, बाजारातील कचरा आणि मैला गाळ यासह मोठ्या प्रमाणात जैवकचऱ्याचा उपयोग करण्यात येणार आहे. गावात स्वच्छता सुनिश्चित करणे, बायोगॅस ऊर्जा निर्माण करणे आणि ग्रामस्थांचे जीवन सुधारणे हा या प्रकल्पामागचा उद्देश आहे. गोबरधन योजनेमुळे घनकचरा, विशेषत: गावांमधील जैव-कृषी कचरा सुरक्षित आणि प्रभावी व्यवस्थापनामध्ये लोकांशी संलग्न होणे अपेक्षित आहे; जेणेकरून गावे स्वच्छ राहतील या उद्देशाने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन ग्रामीणअंतर्गत पालघर जिल्ह्यात माकुणसार येथे गोबरधन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या हस्ते पार पडला. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, समाज कल्याण समिती सभापती मनीषा निमकर, पंचायत समिती सभापती शैला कोलेकर, उपसभापती मिलिंद वडे, पंचायत समिती सदस्य मीना धोडी, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अतुल पारस्कर, कार्यकारी अभियंता गंगाधर निवडुंगे, गटविकास अधिकारी पालघर नरेंद्र रेवंडकर उपस्थित होते. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने माकुणसार ग्रामपंचायत कार्यालयात दोन आदर्श महिलांचा सत्कार अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यात आली.

-----------------
७५ तलावांचे खोलीकरण
पालघर जिल्हा परिषद आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील ७५ तलावांचे खोलीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. ग्रामपंचायत माकूणसार या ठिकाणी काम सुरू करण्यात आले. या वेळी टाटा मोटर्सचे शैलेश माहुलीकर आणि बायफ संस्थेचे अभियंता सिद्धार्थ बोरगावकर, ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये नरेगा विभागाच्या माध्यमातून ग्रामस्थांना तलावाच्या बाजूने फिरण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. निघणाऱ्या गाळाचा वापर हा गावातील विकासकामांसाठी करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com