पोलिस ठाण्याच्या दारातच विवाहितेला मारहाण

पोलिस ठाण्याच्या दारातच विवाहितेला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ : सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात असल्याने ती पोलिसांत तक्रार दाखल करण्यास गेली. मात्र पोलिस ठाण्याच्या दारातच सासरच्या मंडळींनी तिला गाठले आणि मारहाण केल्याची घटना कल्याण खडकपाडा पोलिस ठाण्याच्या बाहेर घडली. या मारहाणीत गायत्री परमार (वय- २०) ही जखमी झाली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांत ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याणमध्ये राहणारे चंदन परमार यांच्यासोबत वर्षभरापूर्वी गायत्री हिचा विवाह झाला. लग्न होऊन काही दिवस होत नाही तोच चंदन हा गायत्रीसोबत किरकोळ कारणावरून वाद घालत मारहाण करत असल्याचे गायत्रीने तक्रारीत म्हटले आहे. गायत्रीने याबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्यात अदखलपात्र तक्रार दाखल केली होती. त्यानंतर खडकपाडा येथील महिला तक्रार निवारण कक्षातदेखील अर्ज केला होता. दरम्यान, फेब्रुवारी १६ पासून गायत्री ही माहेरी राहत होती. महिला तक्रार निवारण कक्षात दोन वेळा त्यांच्या तक्रारींवर समुपदेशन झाले. २५ मे रोजी शेवटच्या सुनावणीवेळी गायत्रीने आपण सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हणाली. महिला तक्रार निवारण कक्षातील समुपदेशनानंतर सर्व जण खाली आले. त्यावेळी परमार कुटुंबाने गायत्री व तिच्या आई- वडिलांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. गायत्रीने ही बाब पोलिसांना सांगितली, पण पोलिसांनी योग्य ते सहकार्य केले नाही, उलट अर्धा तास थांबा, त्यांना आधी जाऊ द्या, मग तुम्ही जा, असा सल्ला दिला. त्यानुसार गायत्री व तिचे आई-वडील अर्ध्या तासाने बाहेर पडले. पोलिस स्टेशन बाहेरील बारावे गाव रिक्षा थांबा येथे गायत्री व तिचे कुटुंब रिक्षा पकडून घरी जाण्याच्या तयारीत असताना परमार कुटुंबाने त्यांना रिक्षातून बाहेर खेचून शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. चंदनच्या भावाने गायत्रीला दगड मारल्यामुळे तिला दुखापत झाली. याप्रकरणी पती चंदन परमार, सासरे विनोद, सासू हेमा, दीर दीपेश आणि अन्य दोघांविरोधात खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास सुरू
याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील म्हणाले, महिला तक्रार निवारण कक्ष येथे समुपदेशनासाठी दोन्ही कुटुंब आले होते. समुपदेशनानंतर महिला तिच्या कुटुंबासोबत जात असताना तिच्या सासरच्या मंडळींनी तिला मारहाण केली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com