सावरकर जयंतीनिमित्त जातिभेदाला तिलांजली देण्याचा संकल्प करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावरकर जयंतीनिमित्त जातिभेदाला  तिलांजली देण्याचा संकल्प करा
सावरकर जयंतीनिमित्त जातिभेदाला तिलांजली देण्याचा संकल्प करा

सावरकर जयंतीनिमित्त जातिभेदाला तिलांजली देण्याचा संकल्प करा

sakal_logo
By

जातिभेदाला तिलांजली देण्याचा संकल्प करा!
सावरकर जयंतीनिमित्त कार्यक्रमात राज्यपालांचे आवाहन

मुंबई, ता. १ ः स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर समाजसुधारक होते. सावरकरांनी जातिभेदाला तीव्र विरोध केला. अस्पृश्यता हा देशावरील कलंक आहे, असे ते सांगत असत. जातिवादाला तिलांजली देण्याचा संकल्प करा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी बुधवारी (ता. १) बोरिवलीत केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून बोरिवलीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात सावरकरांच्या जीवनकार्यावर आधारित दोनदिवसीय प्रदर्शनाचे उद्‍घाटन रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, स्थानिक आमदार सुनील राणे, आमदार योगेश सागर, आमदार अतुल भातखळकर, आमदार मनीषा चौधरी, माजी आमदार हेमेंद्र मेहता आदी सोहळ्याला उपस्थित होते.
वीर सावरकर उत्तम वक्ते, लेखक व इतिहासकार होते. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये अत्यंत शारीरिक हालअपेष्टा सहन करूनही त्यांचे धैर्य डगमगले नाही, असे प्रतिपादन राज्यपालांनी केले. स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांना कमी लेखले गेले याबद्दल राज्यपालांनी खेद व्यक्त केला. क्रांतिकारकांवरील ऐतिहासिक अन्याय दूर करून त्यांचा योग्य सन्मान केला पाहिजे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
राम नाईक आणि गोपाळ शेट्टी यांचीही या वेळी भाषणे झाली. सुरुवातीला राज्यपालांनी सावरकर यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनाला भेट दिली. राज्यपालांच्या हस्ते डॉ. परेश नवलकर, बासरीवादक पं. रूपक कुलकर्णी, सुधा वाघ आणि इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

जन्मगावी स्मारक व्हावे
भावी पिढ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या योगदानाची जाणीव व्हावी म्हणून त्यांच्यावर आधारित स्थायी प्रदर्शन सुरू करावे. नाशिकजवळ असलेल्या त्यांच्या भगूर या जन्मगावी त्यांचे स्मारक उभारले जावे, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली.