‘वंडर्स पार्क’चा पांढरा हत्ती

‘वंडर्स पार्क’चा पांढरा हत्ती

सुजित गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १ ः जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृती साकारलेला आणि नवी मुंबईकरांसाठी विरंगुळ्याचे एकमेव पर्यटनस्थळ असणारे वंडर्स पार्क महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरत आहे. या उद्यानात पालिका विविध परदेशांतील वास्तूंचे शिल्प, अत्याधुनिक खेळणी, विविध रंगांची फुले आणि हिरवळ, कारंजे यासाठी वर्षाला तीन कोटींचा खर्च करत आहे; पण एवढे करून त्याबदल्यात महापालिकेला तिकिटातून वर्षाकाठी निव्वळ सव्वा कोटी रुपये मिळत असल्याने खर्चाचा डोलारा सांभाळणे कठीण झाले आहे.
नेरूळ सेक्टर- १९ जवळ सिडकोने दिलेल्या भव्य मैदानावर २०१२ मध्ये महापालिकेने ३७ कोटी ४० लाख रुपये खर्च करून वंडर्स पार्कची निर्मिती केली होती. या उद्यानात परदेशातील ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती साकारल्यामुळे त्यावरून उद्यानाला वंडर्स पार्क असे नाव देण्यात आले. उद्यानाचा प्रशस्तपणा, हिरवळ आणि खेळण्यांमुळे हे उद्यान अल्पावधीतच नवी मुंबईकरांच्या पसंतीस उतरले होते. मात्र, यातूनही महापालिकेच्या तिजोरीत फारशी भर पडली नसल्याचेच दिसत आहे. कारण दररोज येणाऱ्या पर्यटकांपोटी पालिकेला वर्षाला फक्त सव्वा कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. या उलट उद्यान सांभाळण्यासाठी लागणारे कामगार, स्वच्छतागृहाची देखभाल, उद्यानातील हिरवळ आणि झाडांची देखरेख पाहणाऱ्या मनुष्यबळाच्या वेतन आणि इतर खर्चापोटी कंत्राटदाराला सुमारे साडे तीन कोटी रुपये द्यावे लागत आहेत. त्यामुळे २०१२ पासून ते २०२० पर्यंतच्या आठ वर्षांत तब्बल २९ कोटींचा अतिरिक्त खर्च केला आहे. त्यामुळे हा खर्च भरून काढण्यासाठी पालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
-----------------------------------
खर्चाचा डामडौल पेलताना दमछाक
- वंडर्स पार्कचे २०१२ ला लोकार्पण झाल्यानंतर महापालिकेने हे पार्क उद्यान विभागाकडे हस्तांतर केले. मात्र, तत्कालीन उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना हा पांढरा हत्ती चालवता आला नाही. त्यानंतर पुन्हा हे उद्यान अभियांत्रिकी विभागाकडे देण्यात आले. अभियांत्रिकी विभागाने या उद्यानाला सांभाळण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवल्या; परंतु त्याला अल्प प्रतिसाद मिळाला होता.
- सध्या उद्यान सांभाळण्याची जबाबदारी अश्विन इन्फ्रावर सोपवण्यात आली. तेव्हापासून महापालिकेतर्फे संबंधित कंत्राटदाराला वर्षाला तीन कोटी ६२ लाख रुपये महापालिकेतर्फे देऊन या उद्यानाची देखभाल-दुरुस्ती करून घेतली जात आहे.
----------------------------------
खर्च वसूल करण्याचे आव्हान
कोविड काळात वंडर्स पार्क हे दोन वर्षे बंद असल्यामुळे आणि खेळणी जुनी झाल्यामुळे पुन्हा त्या जागेवर नवीन खेळणी, काँक्रिटीकरण, नवे कारंजे आदी नूतनीकरणाच्या कामावर महापालिकेने पुन्हा २५ कोटी ४० लाख रुपये एवढा खर्च केला. याआधी महापालिकेने २०१२ ला उद्यान उभारणीसाठी केलेला ३७ कोटी ४० लाख आणि ८ वर्षांचा देखभाल दुरुस्तीपोटी केलेला सुमारे ३० कोटी असा एकूण ३७ कोटींचा खर्च वसूल झालेला नाही. अशा परिस्थितीत पुन्हा नूतनीकरणावर केलेला खर्च महापालिका वसूल कसा करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
----------------------------------
शहरातील नागरिकांच्या विरंगुळ्याच्या दृष्टीने महापालिकेने हे उद्यान तयार केले आहे. या उद्यानाच्या देखभाल, दुरुस्तीसोबत खर्च भरून निघण्यासाठी महापालिका स्तरावर विविध पर्यायांची चाचपणी सुरू आहे.
- संजय देसाई, शहर अभियंते, नवी मुंबई महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com