
यंदा मिठी नदीचा धोका?
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः महापालिकेने यंदा मिठी नदीची साफसफाई झाली असल्याचा दावा केला असला, तरी परिसरात राहणारे रहिवासी धास्तावलेलेच आहेत. फक्त मुख्यमंत्र्याचा पाहणी दौरा होता तेथेच नदीची सफाई झाली आहे. परिणामी यंदाच्या पावसाळ्यात पुराचा धोका वाढला आहे, अशी भीती क्रांती नगरमधील रहिवासी व्यक्त करत आहेत.
मिठी नदीमधील दोन लाख १६ हजार १७४ टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. त्यांपैकी आतापर्यंत एक लाख ९५ हजार ५६६ टन गाळ काढण्यात आला. नदीची ९०.४७ टक्के सफाई झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, मुख्यमंत्री ज्या ज्या ठिकाणी दौऱ्यासाठी गेले तिथे मिठी नदीची साफसफाई करण्यात आली, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. मिठी नदीची एकूण लांबी १७.८४ किलोमीटर आहे. नदीच्या सर्वच भागांत साफसफाई झालेली नाही. त्यामुळे जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आणि त्याच वेळी मोठी भरती असेल, तर मिठी नदी वाहण्याचा धोका आहे. वांद्रे-बीकेसी भारत नगर भागात मिठी नदीची सफाई झाली नसल्याचे आढळून आले आहे, असे क्रांती नगरमधील रहिवाशांनी सांगितले.
क्रांती नगर आणि संदेश नगर भागातील नागरिकांनी मिठी नदीची सफाई झाली नसल्याचा आरोप केला आहे. दरवर्षी नदीची सफाई केली जाते. त्यासाठी यंत्रसामुग्री, इतर साधने आणि मनुष्यबळ वापरले जाते. तसे आतापर्यंत काहीही दिसले नाही. त्यामुळे यंदाचा पावसाळा क्रांती नगर आणि संदेशनगरसाठी धोक्याचा आहे, अशी भीती तेथील झोपडपट्टीतील रहिवाशांनी व्यक्त केली.
क्रांती नगर आणि संदेश नगरातील झोपडपट्ट्या मिठी नदीच्या टप्य्यात आहेत. नदीची अजूनही साफसफाई झालेली नाही. पावसाचाही अंदाज देता येत नसल्याने भीती वाटत आहे. येथे मिठीचा गाळ काढलेलाच नाही. नदीची साफसफाई करा.
- किशोर सोनार, रहिवासी, क्रांती नगर