ज्युनियर डॉक्टर संपावर, रुग्णांना फटका

ज्युनियर डॉक्टर संपावर, रुग्णांना फटका

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालयातील कनिष्ठ आणि वरिष्ठ डॉक्टरांमधील संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच होता. वरिष्ठ डॉक्टरांवर हुकूमशाहीचा आरोप करत कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप सुरूच ठेवला आहे. या संपाचा सर्वांत मोठा फटका दूरदूरच्या खेड्यांतून डोळ्यांच्या उपचारांसाठी आलेल्या गरीब रुग्णांना बसला आहे. गुरुवारी (ता. १) संपाच्या पहिल्या दिवशी नेत्ररोग विभागात एकाही रुग्णावर मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रिया करण्यात आली नाही.
नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारीख आणि ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्यावर हुकूमशाही व गैरवर्तनाचा आरोप करत येथील कनिष्ठ निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत. दुसरीकडे या कनिष्ठ डॉक्टरांचे बिनबुडाचे आरोप आणि रोज होणाऱ्या त्रासाला कंटाळून येथील नऊ वरिष्ठ डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. गुरुवारी संपाचा पहिला दिवस होता. या संपामुळे नेत्रचिकित्सा विभागात डोळ्याची एकही शस्त्रक्रिया झाली नाही. साधारणपणे नेत्ररोग विभागात दररोज २५ ते ३० शस्त्रक्रिया होत होत्या.
जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले की, नेत्ररोग विभागात नेहमीप्रमाणे ओपीडी सुरू होती; मात्र एकही शस्त्रक्रिया झाली नाही. वरिष्ठ डॉक्टरांनी एक दिवस आधी सर्वांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला होता. याशिवाय गुरुवारी दुपारी २ वाजेपर्यंत रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये १,४२३ रुग्ण आले. तर ७२ नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. यासोबतच रुग्णालयात दिवसभरात ३० रुटीन शस्त्रक्रिया झाल्या, त्यात ५ आपात्कालीन शस्त्रक्रियेचा समावेश आहे. ३०पैकी सात प्रमुख आणि २३ लहान शस्त्रक्रिया होत्या.
दरम्यान, निवासी डॉक्टरांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनाही या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले असून तक्रारींच्या निवारणासंबंधित पत्र दिले आहे.
...
२४ तासांचा अल्टिमेटम
जे. जे. रुग्णालय मार्डचे अध्यक्ष डॉ. शुभम सोनी यांनी सांगितले की, आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत. प्रथम नेत्ररोग विभागप्रमुख डॉ. रागिणी पारीख व डॉ. तात्याराव लहाने यांची तत्काळ हकालपट्टी करून, त्यांची बदली झाल्यानंतर नॅशनल मेडिकल कौन्सिलनुसार नेत्ररोग विभागात तातडीने नवीन वरिष्ठ डॉक्टरांची नियुक्ती करावी आणि तृतीय कनिष्ठ डॉक्टरांचे थकीत मानधन त्वरित मिळावे. रुग्णालय प्रशासनाने २४ तासांत याबाबत निर्णय न घेतल्यास सेंट्रल मार्डच्या मदतीने राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत बेमुदत संपावर जाणार असल्याचे डॉ. सोनी यांनी सांगितले.
...
राजीनाम्याबाबत शंका
जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या राजीनाम्यावर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी सांगितले की, मला ८ डॉक्टरांचे राजीनामे मिळाले आहेत. ते अधिकृत प्रक्रियेत आलेले नाहीत. नियमानुसार हे सर्व राजीनामे विभागप्रमुखांमार्फत माझ्याकडे यायला हवेत. या विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांनी स्वत: निवृत्तीसाठी विनंती केल्याने हे सर्व राजीनामे थेट माझ्याकडे आले आहेत. याशिवाय डॉ. तात्याराव लहाने यांचा जे. जे. रुग्णालयाशी काहीही संबंध नाही. शासकीय ठरावानुसार अंधत्व निवारण मुक्त महाराष्ट्र समन्वयक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय इतर सात ज्येष्ठ डॉक्टरांच्या राजीनाम्याची पत्रे एकतर तारखा नाहीत किंवा त्यावर स्वाक्षऱ्या नाहीत. त्यामुळे या राजीनामा पत्रांबाबत या ज्येष्ठ डॉक्टरांकडून हे राजीनामापत्र त्यांचेच आहे की नाही, याचीही माहिती घेतली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com