मालवणीतील अनधिकृत बांधकामे पाडली

मालवणीतील अनधिकृत बांधकामे पाडली

मालवणीत अनधिकृत झोपड्यांवर कारवाई
मालाड, ता. १ (बातमीदार) ः मालाड मालवणीतील अंबोजवाडी परिसरातील अनधिकृत झोपड्या आज जिल्हाधिकारी अतिक्रमणविरोधी विभागाच्या वतीने जमीनदोस्त करण्यात आल्या. सहा हजार चौरस मीटर जागा कारवाईदरम्यान मोकळी करण्यात आली. अंबोजवाडीतील कारगिल रोडवरील शासनाच्या भूखंडावर जवळपास दोनशे झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. आजच्या कारवाईत त्या हटवण्यात आल्या. उपजिल्हाधिकारी तनुजा वडनेरे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पोलिसही कारवाईत सहभागी झाले होते.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत मालवणी परिसरातील बांग्लादेशी नागरिकांच्या अवैध स्थलांतराबाबत मंत्रालयात आढावा बैठक झाली होती. त्या वेळी मुंबई पोलिस आणि जिल्हाधिकाऱ्यांना मालवणीतील अनधिकृत बांधकामांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारपासून परिसरातील अनधिकृत बांधकामे पाडण्यास सुरुवात झाली. अतिक्रणविरोधी कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत या वेळी देण्यात आले आहेत.

५० लाखांच्या ड्रग्जसह दोघांना अटक
अंधेरी (बातमीदार) ः सुमारे ५० लाख रुपयांच्या एमडी ड्रग्जसह दोघांना वांद्रे युनिटच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने आज अटक केली. रमेश परमार आणि सराफतअली खान अशी दोघांची नावे आहे. दोघांकडून पोलिसांनी २५५ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्ज साठा जप्त केला आहे. दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे. गोरेगाव परिसरात काही जण एमडी ड्रग्जच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वांद्रे युनिटच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संतोषनगर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून दोन संशयित तरुणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना २५५ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत सुमारे ५० लाख रुपये इतकी आहे.

कर्ज फेडण्यासाठी अपहरणाचा बनाव करणाऱ्या तरुणाला अटक
अंधेरी (बातमीदार) ः नवीन मोबाईल घेण्याच्या नादाने कर्जबाजारी झालेल्या एका २७ वर्षांच्या तरुणाने स्वतःच्या अपहरणाचा कट रचून पत्नीसह वडिलांकडे सुटकेसाठी पाच लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच अवघ्या पाच तासांत बांगुरनगर पोलिसांनी एका मोठ्‍या रिटेल शॉपचा मॅनेजर असलेल्या जितेंद्र जोशी याला अटकक केली. त्याला पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. दिनेशलाल जोशी यांचा दूधविक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा मोठा मुलगा जितेंद्र बुधवारी दुपारी कामावर गेला. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्याच दरम्यान त्याच्या पत्नीच्या मोबाईलवर एकाने व्हॉटस्ॲप कॉल करून जितेंद्रचे अपहरण झाले असल्याचे सांगून त्याच्या सुटकेसाठी पाच लाखांची खंडणी मागितली. जितेंद्रचे हातपाय बांधलेले फोटो तिला पाठवून पोलिसांत तक्रार केल्यास परिणाम वाईट होतील, अशी धमकी दिली. त्यानंतर जितेंद्रच्या कुटुंबीयां बांगूरनगर पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणासह खंडणीचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून अवघ्या पाच तासांत पोलिसांनी एका ठिकाणाहून जितेंद्रची सुटका केली. त्याच्या चौकशीत त्यानेच स्वतःच्या अपहरणाचा बनाव केल्याचे स्पष्ट झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com