
सिडकोच्या संचालकपदी अनिल डिग्गीकर
सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. ३ : राज्य सरकारने २० ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी केलेल्या बदल्यांनंतर आज पुन्हा पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार म्हाडाचे मुख्याधिकारी अनिल डिग्गीकर यांची सिडकोच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे; तर सिडकोचे उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांची मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मनीषा पाटणकर यांना अतिरिक्त मुख्य सचिव पदावर बढती देत त्यांची नियुक्ती सार्वजनिक बांधकाम विभागात करण्यात आली आहे. तसेच प्रशासन विभागाचा आणि राजशिष्टाचार हा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडेच देण्यात आला आहे. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. के. एच. गोविंद राज यांची नगर विकास विभागाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे; तर नगर विकास विभागाचे प्रधान सचिव आशिष शर्मा यांची नियुक्ती एमएमआरडीए आयुक्त-२ या पदावर करण्यात आली आहे.