‘त्या’ पत्राकडे रेल्वे मंत्र्यांचे दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘त्या’ पत्राकडे रेल्वे मंत्र्यांचे दुर्लक्ष
‘त्या’ पत्राकडे रेल्वे मंत्र्यांचे दुर्लक्ष

‘त्या’ पत्राकडे रेल्वे मंत्र्यांचे दुर्लक्ष

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ४ : दक्षिण पूर्व रेल्वेच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वेस्थानकाजवळ तीन रेल्वे गाड्यांचा भीषण अपघात झाला. हा अपघात मानवी चूक, सिग्नल यंत्रणेतील त्रुटी अशा कारणांमुळे झाल्याची चर्चा आहे; मात्र या घटनेनंतर भारतीय रेल्वेतील तीन लाख पदे रिक्त असल्याने कामाचा ताण वाढल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ज्या विभागात अपघात झाला त्या दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये १७ हजार ५७९ पदे रिक्त आहेत. याशिवाय दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाच्या प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापकांनी म्हैसूरमधील एका दुर्घटनेचा हवाला देत सिग्नलिंग यंत्रणा दुरुस्त करण्याची विनंती केली होती. रेल्वे मंत्रालयाने त्याची अंमलबजावणी का केली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ओडिशात शुक्रवारी (ता. २ जून) कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर होऊन झालेला रेल्वे अपघात हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा अपघात आहे. या अपघातात २८८ प्रवासी मृत्युमुखी आणि १,१७५ प्रवासी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर भारतीय रेल्वेच्या कारभारावर सर्व स्तरांतून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. भारतीय रेल्वेकडून दररोज नियमित आणि विशेष गाड्यांची संख्या वाढवली आहे; परंतु कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आलेली नाही. भारतीय रेल्वेत तीन लाख १२ हजार ९४४ पदे रिक्त आहेत. भारतीय रेल्वेमधील सर्व झोनमध्ये सेफ्टी विभागातील बहुतांश जागा रिक्त आहेत. ज्यामध्ये गँगमन, कीमन, हेल्पर, पॉइंटमॅन, ट्रॅकमॅन, मोटरमॅन आणि रेल्वे गार्डची पदे तात्काळ भरणे गरजेचे आहे. मात्र २०१७ ते २०२२ या काळात भारतीय रेल्वेत १ लाख ७८ हजार ५४४ पदे भरली असल्याची माहिती अधिकारांतर्गत दिली आहे. मात्र २०१९ मध्ये दोन लाख जागांसाठी आरआरबी, आरआरसीची परीक्षा घेण्यात आली आहे. अजूनही ती भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. अनेक झोनमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना आजही १२ तास कामावर राहावे लागते. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
...
१७ हजार ५७९ पदे रिक्त
विशेष म्हणजे तीन रेल्वे गाड्यांचा जिथे भीषण अपघात झाला तो परिसर दक्षिण पूर्व रेल्वे विभागात येतो. या विभागात १७ हजार ५७९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतो आहे. रेल्वे बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण पूर्व रेल्वे आणि पूर्व किनारी रेल्वे या विभागात कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास जास्त असतात. त्यामुळे रेल्वेने कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करावा.
...
रेल्वेत तीन लाख पदे रिक्त, वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदेही रिक्त, ती नऊ वर्षांत का भरली गेली नाहीत? भारतीय रेल्वेत मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता असल्याची कबुली स्वतः रेल्वे बोर्डाने दिली आहे. लोको पायलटचे दीर्घ कामाचे तास, अपघातांच्या वाढत्या संख्येचे मुख्य कारण आहे. मग ही पदे का भरली नाहीत? ८ फेब्रुवारी २०२३ रोजी दक्षिण पश्चिम रेल्वे झोनच्या प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापकांनी म्हैसूरमधील एका दुर्घटनेचा हवाला देत सिग्नलिंग यंत्रणा दुरुस्त करण्याची विनंती केली होती. रेल्वे मंत्रालयाने त्याची अंमलबजावणी का केली नाही?
- मल्लिकार्जुन खर्गे, अध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस
...
रिक्त पदे
१. मध्य रेल्वे - २८,६५५
२. पूर्व रेल्वे - ३०,१४१
३. पूर्व मध्य रेल्वे - १४,७२३
४. पूर्व किनारपट्टी रेल्वे १०,०४३
५. मेट्रो रेल्वे -९३५
६. उत्तर रेल्वे- ३८,७५४
७. उत्तर मध्य रेल्वे - १८,५०९
८. उत्तर-पूर्व रेल्वे - १४,०७४
९. ईशान्य सीमा रेल्वे- १५,६७२
१०. उत्तर पश्चिम रेल्वे - १५,१८४
११. दक्षिण रेल्वे - २२,५०६
१२. दक्षिण मध्य रेल्वे - १७,०६८
१३. दक्षिण पूर्व रेल्वे - १७,५७९
१४. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे - ८,१०६
१५. दक्षिण पश्चिम रेल्वे - ६,६१९
१६. पश्चिम रेल्वे- ३०,४७६
१७. पश्चिम मध्य रेल्वे - ११,५५९
१८. इतर युनिट - १२,३४३