समृद्धी महामर्गावर पाच तासांत तिघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समृद्धी महामर्गावर पाच तासांत तिघांचा मृत्यू
समृद्धी महामर्गावर पाच तासांत तिघांचा मृत्यू

समृद्धी महामर्गावर पाच तासांत तिघांचा मृत्यू

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर नियमित अपघातांची मालिका सुरू आहे. प्रत्येक दिवशी अपघात होत असून ११ डिसेंबर ते ३० एप्रिलपर्यंत ३५८ अपघात झाले आहेत. त्यामध्ये सुमारे ४० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आता समृद्धी महामार्गाचा शिर्डी ते भरवीर या ८० किलोमीटरचा दुसरा टप्पासुद्धा सुरू झाला असून, अपघाताची मालिका कायम आहे. शनिवारी (ता. ३) २४ तासांत ५ अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला आहे.

समृद्धी महामार्गावर सर्वाधिक अपघात अतिवेगाने वाहन चालवल्यानंतर डुलकी लागून झाल्याचे समोर आले आहे; तर ओव्हरस्पीडिंगचे अपघातसुद्धा जास्त आहेत. त्याशिवाय टायर फुटणे, तांत्रिक बिघाड, वन्यजीव प्राणी रस्त्यावर येऊन अपघात, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, महामार्गावर बेकायदा पार्किंग आणि मद्य प्राषण करून वाहन चालवण्यासह अनेक अपघातांची कारणे पुढे आली आहेत.

महामार्ग पोलिसांच्या माहितीनुसार शनिवारी टायर फुटून एक अपघात, डुलकी लागल्याने दोन, ओव्हरस्पीडिंगमुळे एक आणि इतर कारणामुळे एक अशा पाच अपघातांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये डुलकी लागल्याने झालेल्या अपघातांमध्ये एकाचा; तर ओव्हरस्पीडिंगच्या अपघातामध्ये दोघांचा असा तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वाहन चालवताना नागरिकांनी मध्ये थांबणे गरजेचे आहे. त्याशिवाय वेगाने वाहन चालवू नये. समृद्धी महामार्गावर लांब पल्ल्यावर प्रवास करत असताना वाहनाचा टायर तपासावा, असे आवाहन अपर पोलिस महासंचालक डॉ. रवींद्र सिंघल यांनी केले आहे.