दुतर्फा पार्किंगने चालकांची कसरत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुतर्फा पार्किंगने चालकांची कसरत
दुतर्फा पार्किंगने चालकांची कसरत

दुतर्फा पार्किंगने चालकांची कसरत

sakal_logo
By

तुर्भे, ता. ५ (बातमीदार) : घणसोली नोडमध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्या अनुषंगाने विविध परिवहन उपक्रमांतून प्रवासी वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्यात आली आहे; परंतु ज्या मार्गावरून परिवहन उपक्रमाच्या बस धावत आहेत. त्याच मार्गावर दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक समस्या जटिल होत चालली आहे. त्याचा फटका या मार्गावरील परिवहन उपक्रमाच्या बसला बसत असून वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
नवी मुंबई पालिका परिवहन उपक्रमाच्या ९, १०, १८, २०, ५५ या बस घरोंदा बस थांब्यावरून वाशी रेल्वेस्थानक, नेरूळ, खारघर, उलवे या शेवटच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धावत असतात; तर बृहन्मुंबई परिवहन उपक्रमाची ५२१ क्रमांकाची एकच बस धावत असली तरी पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर धावत असते. यामुळे घणसोली नोड भागातील विविध मार्गांवरून धावणाऱ्या बसची गर्दी नेहमीच पाहायला मिळते. मात्र, रिक्षा प्रवाशी वाहतूक तसेच विविध प्रकारच्या व्यावसायिकांकडून होणाऱ्या साहित्य आयात होणारी वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी केली जात असल्याने बसचालकांना त्रास होत आहे. त्यामुळे पालिकेने रस्त्याच्या दुतर्फा सम, विषम पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे.
--------------------------------
ग्राहकांची वाहने रस्त्यावर
घणसोली रेल्वे स्थानकासमोरून सेक्टर सातकडे येणाऱ्या रस्त्यावर विविध प्रकारचे व्यावसायिक व्यवसाय करतात. त्याचबरोबर किराणा, कपडे, सोनारांची दुकाने खूप आहेत. त्यामुळे येथे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची रेलचेल असते. अनेकदा ग्राहक आपली दुचाकी, कार रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या करतात. त्यामुळे पालिका परिवहन उपक्रमाच्या बस येथून पास होताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
--------------------------------------
चाकरमान्यांना सर्वाधिक फटका
घणसोली सेक्टर एकवरून सेक्टर चारकडून घरोंदाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पार्किंगची अवस्था, यापेक्षा वेगळी नाही. या ठिकाणी बेकायदा फेरीवाल्यांनी पदपथ गिळंकृत केले आहेत. येथेही रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी राहत आहेत. या रस्त्यावरून पालिकेची एकमेव वीस मिनिटांनी धावणारी ९ क्रमांकाची घणसोली, घरोंदा ते वाशी रेल्वेस्थानक ही बस नेहमीच अडखळत चालते. यामुळे प्रवासी वर्ग नाराजी व्यक्त करत आहेत.
------------------------------------------
पार्किंगच्या ठिकाणी व्यावसायिक गाळे
घणसोली रेल्वेस्थानकाच्या समोरून जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला रो-हाऊस आहेत. या ठिकाणी तळ मजला हा पार्किंगसाठी राखीव आहे; परंतु या ठिकाणी विविध रो-हाऊसमधील तळ मजल्यावर अनेक व्यवसाय सुरू केल्याने वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत.
-------------------------------------
घणसोली विभागातील नो पार्किंगसंबंधी माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल. तसेच घणसोली अभियांत्रिकी विभागाला कळवले जाईल.
ः- संजय देसाई, शहर अभियंता, पालिका
---------------------------------
घणसोली नोडल परिसरात वाहतूक समस्येने चालक त्रस्त आहेत. याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस, तसेच पालिकेने यावर तोडगा काढावा.
- दिलीप व्यवहारे, उपाध्यक्ष, भाजप, नवी मुंबई