
मधमाशीच्या घराने रहिवाशांना धास्ती
कोपरखैरणे, ता. ६ (बातमीदार) : वाढत्या शहरीकरणामुळे पूर्वी झाडांना लागणारी मधाची पोळी आता इमारतींना लागली आहेत. अनेकदा या मधमाश्या हल्ला करत असल्याने हा प्रकार कोणाच्या तरी जिवावर बेतण्याचा धोका आहे. त्यामुळे पालिका तसेच अग्निशमन विभागाकडे मधमाश्यांची पोळी हटवण्याची मागणी केली जात आहे, पण अधिकृत यंत्रणाच नसल्याने आदिवासींना बोलावण्याची वेळ येत आहे.
घणसोली सेक्टर १० येथील मेघ मल्हार सोसायटीमध्ये मधाची पोळी इमारतीला लागली आहेत. याबाबत रहिवाशांकडून पालिका तसेच अग्निशमन विभागाशी पत्रव्यवहार करून ही पोळी हटवण्याची मागणी केली जात आहे; मात्र संबंधित यंत्रणेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या वर्षी हीच परिस्थिती असल्याने काही आदिवासी बांधवांना पोळी काढण्यासाठी बोलावण्यात आले होते, पण हा प्रकार धोकादायक असून घरात मधमाश्या शिरल्याने लहान मुले तसेच वयोवृद्धांना त्रास होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे पालिका तसेच अग्निशमन विभागाने यंत्राद्वारे ही पोळी हटवावीत, अशी मागणी रहिवासी करत आहेत.
------------------------------------------
गूळमिश्रित मधाची विक्री
शहरात अनेक ठिकाणी मधाची विक्री केली जाते, पण त्यांच्याकडे असलेला मध गूळमिश्रित असल्याने नागरिकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेकदा शुद्ध मध मिळण्याच्या आशेने काही जण पोळी काढण्याचा प्रयत्न करतात; मात्र हा प्रकार जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे पालिकेने याबाबत काही तरी यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
-----------------------------------
मोठ्या प्रमाणात मधमाश्या चावल्या तर मृत्यू होऊ शकतो. अशा अनेक घटनांची नोंद आहे; मात्र एखाद् दुसरी मधमाशी चावली तर आग होणे असे प्रकार होतात.
- व्यंकटेश मेतन, डॉक्टर, घणसोली
-----------------------------------
एकदा मधमाश्यांनी हल्ला केला होता. त्या वेळी जिन्यावरून पळत असताना पाय मुरगाळला आहे. अजूनही मी डॉक्टरकडे उपचार घेत आहे.
- शीतल पवार, रहिवासी
--------------------------------------
शहरातील उंच इमारतींमधील ही पोळी काढण्यासाठी आमच्याकडे सध्या कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे अग्निशमन विभागाला जर संपर्क केला तर त्यांच्याकडून मदत मिळू शकते.
- संजय तायडे, विभागीय अधिकारी, पालिका
--------------------------------------