
तरुणांनी स्पर्धा परीक्षेमध्ये करिअर करावे
विरार, ता. ६ (बातमीदार) : विद्यार्थ्यांनी आपला कल कोणत्या विषयाकडे आहे, हे बघतच आपले क्षेत्र निवडावे. संपूर्ण आत्मविश्वासाने व जिद्दीने आपले करिअर पूर्ण करावे. यासाठी यूपीएससी व एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये चर्मकार समाजातील मुला-मुलींनी आपले करिअर करावे, असे आवाहन सेवानिवृत्त आयपीएस डॉ. किरण जाधव यानी केले.
चर्मकार मंच ठाणे व पालघर जिल्ह्याच्या वतीने ‘घे भरारी’ हे चर्मकार समाजाच्या युवक-युवतींसाठी एकदिवसीय मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे रेणुका विद्यालय झिडके, अंबाडी येथे हे शिबिर पार पडले. या वेळी डॉ. किरण जाधव बोलत होते. शिबिराला पालघर जिल्ह्यातील ४५० पेक्षा जास्त युवक-युवती सहभागी झाले होते. शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून राज्य आयुक्त लोकसेवा आयोग व सेवानिवृत्त आयपीएस डॉ. किरण जाधव, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित जलतरणपटू शुभम वनमाळी, ॲड. अक्षता संकेत जाधव, मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ भोईर व ॲड. राजाराम मुकणे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविकात चर्मकार मंचाचे अध्यक्ष संदेश जाधव यांनी मंचाची वाटचाल, समाजाची शैक्षणिक प्रगती व शिबिराचा उद्देश कथन केला. या वेळी देवव्रत वाळिंजकर व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा विजेता संस्कार जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.