पर्यटन विकासासाठी २८ कोटींचा निधी

पर्यटन विकासासाठी २८ कोटींचा निधी

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ : कल्याण ग्रामीण पट्टा हा नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे. त्यामुळे नागरिकांचे मनोरंजन तसेच त्यांना फिरण्यासाठी एक चांगले ठिकाण मिळावे; तसेच या भागात पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सातत्याने पर्यटन विभागाकडे पाठपुरावा करत होते. गेल्या काही दिवसांत या भागातील पर्यटनासाठी २८ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये दावडी येथे पक्षी अभयारण्य, मलंगगड परिसराचे सुशोभीकरण, पावशेपाडा तलाव आणि शिव मंदिर स्थळांसाठी निधी उपलब्ध झाला आहे.
रस्ते, पाणी, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन या पायाभूत सुविधांसह मतदारसंघातील नागरिकांना समाधानाचे आयुष्य जगता यावे. त्यांचा हॅपिनेस इंडेक्स वाढावा. तसेच या क्षेत्रात पर्यटन विकासाला चालना मिळावी म्हणून खासदार शिंदे प्रयत्नशील होते. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित श्रीमलंग गड या धार्मिक आणि पर्यटन स्थळाकडे प्राधान्याने लक्ष देण्यात आले. येथील पाण्याचे दुर्भिक्ष संपवण्यासाठी येथे पाणी योजना राबवण्यास सुरुवात केली. श्री मलंग गडाचा पर्यटन विकासांतर्गत चेहरामोहरा बदलण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार श्री मलंगगडाच्या पर्यटनाच्या अंगाने विकास करण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. यात गडाकडे जाणाऱ्या पायऱ्या, येथे संरक्षक कठडे यांची उभारणी केली जाते आहे. या पायऱ्या काळ्या दगडात बांधल्या जात आहेत. त्याचे काम प्रगतिपथावर आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील दुर्गाडी स्थळाच्या विकासासाठी अशाच प्रकारे सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी खासदार शिंदे यांनी पाठपुराव्याने प्राप्त केला; तर मतदारसंघातील पावशेपाडा आणि कांबा येथील तलाव आणि शिव मंदिराचा परिसर सुशोभीकरणासाठी तब्बल ८ कोटींची निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
नुकताच राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने डोंबिवली येथील दावडी डोंगरावर पक्षी अभयारण्य आणि जैवविविधता उद्यान विकसित करण्यासाठी पाच कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. खासदार शिंदे यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत मंत्री लोढा यांनी या निधीला मंजुरी दिली आहे.


निधी पुढीलप्रमाणे
· श्री मलंग वाडी परिसर सुशोभीकरण करणे - एकूण निधी - १० कोटी

· मौजे कांबा येथे शासकीय जागेवर असलेल्या तलावाचे सुशोभीकरण करणे - एकूण निधी ५ कोटी

· कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याची डागडुजी करणे - एकूण निधी ५ कोटी

· कांबा पावशेत येथील शिवमंदिर परिसर सुशोभीकरण करणे - एकूण निधी - ३ कोटी

· कल्याण तालुक्यातील डोंबिवली (दावडी) आणि भाल येथील पक्षी अभयारण्याचे सुशोभीकरण करणे - एकूण निधी - ५ कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com