बायकोने आईची बाजू घेतल्याने मारहाण

बायकोने आईची बाजू घेतल्याने मारहाण

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ : आईने तिच्या माहेरच्यांकडून जमिनीचे मिळालेले पैसे द्यावे, यासाठी मुलगा सतत तगादा लावत होता. त्यावर पत्नीने नवऱ्याला आपल्याला ते पैसे नकोत, असे म्हणत आईची बाजू घेतली. यावर रागवलेल्या नवऱ्याने पत्नीचाच गळा दाबून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा ऐकल्याने शेजाऱ्यांनी धाव घेत तिचा जीव वाचवला. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात संतोष म्हसकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
डोंबिवली पूर्वेतील भोपर कमानीजवळील मुक्ताई कॉलनीत संतोष म्हसकर आपल्या कुटुंबासह राहतो. संतोषची आई त्याच्यापासून वेगळी राहते. आईला तिच्या माहेरून जमिनीचा हिस्सा मिळाला होता. ही जमीन विकल्याने तिच्याकडे पैसे आले होते. जमिनीच्या विक्रीतून आलेले पैसे मला दे असा तगादा संतोषने आईकडे लावला होता. परंतु संतोषला दारूचे व्यसन असल्याने ती त्याला पैसे देत नव्हती. आई पैसे देत नसल्याने संतोष आणि त्याची बायको सुहासिनी यांच्यात वाद झाला. या वेळी दारू पिता तर पैसे कशाला हवेत. आपल्याला त्यांचे पैसे नको, असे तिने संतोषला सांगितले. बायकोच्या अशा बोलण्याचा त्याला राग आला. तिला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. घरातील वाद ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेत सुहासिनीची सुटका केली. त्यानंतर तिने आपल्या कुटुंबासह मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत पतीच्या विरोधात मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच मानपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत संतोषला अटक केली असून पुढील तपास मानपाडा पोलिस करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com