कुस्तीपटू महिलांच्या समर्थनात मुंबई कॅथेलिक सभेचे आंदोलन

कुस्तीपटू महिलांच्या समर्थनात मुंबई कॅथेलिक सभेचे आंदोलन

गोरेगाव, ता. ६ (बातमीदार) : गोरेगावमधील एम. जी. रोड परिसरात महिला कुस्तीपटूंच्या समर्थनात मुंबई कॅथॉलिक सभेने सोमवारी (ता. ५) सायंकाळी आंदोलन केले. या वेळी बृजभूषण सिंह यांच्या फोटोवर फुली मारलेले पोस्टर्स लोकांनी हातात घेतले होते.
हातात मेणबत्त्या घेऊन कॅथॉलिक समाज रस्त्यावर उतरला होता. मुंबई कॅथॉलिक सभेचे अध्यक्ष डोल्फि डिसुझा यांनी या वेळी सांगितले, की कुस्तीपटू मुलींनी देशाला मेडल्स मिळवून दिले. त्यांना अशी वागणूक दिली जात असेल, तर सामान्य मुलींना कसा न्याय मिळणार, असा सवालही त्‍यांनी या वेळी केला. ही परिस्थिती भयावह असून देशात हुकूमशाही सुरू असल्‍याचे मत त्‍यांनी मांडले. पंतप्रधान एकीकडे ‘बेटी बचाओ; बेटी पढाओ’ असा नारा देतात आणि दुसरीकडे देशाचा गौरव असलेल्या महिला कुस्तीपटूंना अशा प्रकारची वागणूक देत आहेत, ज्याचा आम्ही निषेध करतो आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही आम्ही त्यांच्या समर्थनार्थ उभे राहू, असेही त्‍यांनी या वेळी सांगितले.
रोसरी चर्चच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आले. यात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आंदोलनकर्त्या लीना जोसेफ म्हणाल्या, की देशात मुलींची सुरक्षा हा नेहमी कळीचा मुद्दा बनला आहे. कुठल्या ना कुठल्याप्रकरणी आपल्याला मुलींसाठी नेहमी रस्त्यावर यावे लागते. सध्याची परिस्थिती तर अगदीच लोकशाहीला काळिमा फासणारी आहे. कुस्तीपटू मुली ज्यांना जग ओळखते त्या मुलींचा छळ झाला आहे आणि त्यांची एफआयआरसुद्धा नोंदवली गेली नाही, ज्यासाठी त्यांना कोर्टात जावे लागले. ही गोष्ट फार निंदनीय आहे, असे त्या ‘सकाळ’शी बोलताना म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com