
तलावात सापडला महिलेचा मृतदेह
भिवंडी, ता. ६ (बातमीदार) : कामतघर भागातील वऱ्हाळादेवी तलावात सोमवारी सायंकाळच्या सुमारास पन्नास वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या महिलेने तलावात आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान, भिवंडी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतन काकडे यांनी सांगितले, की ‘वऱ्हाळ देवी तलावात एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याची दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाची मदत घेत महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.’ महिलेचे वय अंदाजे ५० वर्षांपेक्षा जास्त आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.