
वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
भिवंडी, ता. ६ (बातमीदार) : ठाणे-नाशिक मार्गावरील मानकोली नाका पुलाच्या सुरुवातीला अज्ञात वाहनाने एका ४० वर्षीय महिलेला धडक दिल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद नारपोली पोलिस ठाण्यात करण्यात आली असून महिलेच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकोली नाका ब्रिजच्या प्रारंभी सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने एका अंदाजे ४० वर्षीय पादचारी महिलेला जोरात धडक दिली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेनंतर वाहनचालक पळून गेला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता शासकीय रुग्णालयात पाठवला असून मृतदेहाची ओळख पटवण्यासह महिलेच्या नातेवाईकांचाही पोलिस तपास करीत आहेत. या अपघातप्रकरणी पोलिस हवालदार कपिल पाटील यांच्या फिर्यादीवरून महिलेच्या आकस्मिक मृत्यूची नोंद नारपोली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक व्ही. एस. शिरसाट करीत आहेत.