खड्डेमुक्त ठाण्याच्या मार्गात मेट्रोचा खोडा

खड्डेमुक्त ठाण्याच्या मार्गात मेट्रोचा खोडा

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : पावसाळ्यात खड्डेमुक्त रस्ते देण्याचा प्रयत्न ठाणे महापालिका करत असताना मेट्रोच्या कामामुळे पावसाळ्यात वाहतुकीत खोडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मेट्रोच्या पिलरसाठी खोदलेले खड्डे, खणलेल्या गटारांची कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर मेट्रोच्या परिसरात पाणी साठण्याची मोठी शक्यता आहे. ही परिस्थिती उद्भवू नये व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्व प्राधिकरणांसोबत बैठक घेतली. सध्या ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात महापालिका व मेट्रो प्राधिकरणामार्फत विविध कामे सुरू असून ही कामे पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या. पावसाळयात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने सर्व यंत्रणांनी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महापालिका, मेट्रो प्राधिकरण व वाहतूक पोलिस या यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधून कामे करावीत, पावसाळ्यात कोणत्याही ठिकाणी पाणी साचणार नाही हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सध्यस्थितीतील कामे ही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व यंत्रणांना दिले.


--
पिलरभोवतीचे खड्डे बुजवा
मेट्रोचे पिलर उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. पिलर उभारण्याचे काम झाल्यानंतर त्याच्या सभोवती मोठा खड्डा निर्माण होतो, अशा प्रकारचे खड्डे वेळीच न बुजवल्यास या ठिकाणी पाणी साचून संपूर्ण परिसरात पाणी साचून वाहतूक कोंडी होण्याबरोबरच खड्डा किती खोल आहे याचा अंदाज न आल्यास अपघातदेखील होण्याची शक्यता आहे. तरी मेट्रो मार्गावर उभारण्यात आलेल्या सर्व पिलरची पाहणी करून ज्या ठिकाणी खड्डे असतील ते योग्य पद्धतीने बुजवण्याची कार्यवाही करावी, तसेच आवश्यकतेनुसार माहिती फलक लावण्याच्या सूचनाही आयुक्तांनी या वेळी दिल्या.

--
चार दिवसांची मुदत
मेट्रोच्या माध्यमातून करण्यात येत असलेली मान्सूनपूर्व कामे ही येत्या दोन ते चार दिवसांत पूर्ण केली जातील. तसेच पावसाळ्यात आपत्कालीन यंत्रणाही सज्ज असेल, असे मेट्रो प्रधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com