
संजय राऊतांना धमकी देणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
मुंबई, ता. १० : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी कांजूरमार्ग पोलिसांनी आज सायंकाळी दोन जणांना अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रिझवान आणि शाहिद अन्सारी अशी दोघांची नावे आहेत. या दोघांना पोलिसांनी शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी ताब्यात घेतले होते.
रिझवान रिक्षाचालक असून शाहिद हा व्यवसायाने कारपेंटर आहे. दोघेही गोवंडीत राहतात. सुनील राऊत यांना मिळालेल्या धमकीची कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नव्हती; परिणामी अटक करता आली नाही. याप्रकरणी पोलिसांकडे आज अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार दाखल होताच दोघांना अधिकृतरीत्या अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. न्यायालयाने दोघांना पोलिस कोठडी सुनावली आहे.
‘सकाळची पत्रकार परिषद बंद करा; अन्यथा दोघांना जीवे मारू, या महिन्यात तुम्हाला गोळ्या घालून स्मशानात पाठवू’ अशी धमकी देण्यात आल्याचे सुनील राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. गुरुवारी, ८ जून रोजी ४ च्या दरम्यान मला तीन ते चार फोन आले. त्याने मला आणि संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असेही सुनील राऊत यांनी सांगितले.