दिव्यांगांना छेडणाऱ्यांवर कारवाई करा

दिव्यांगांना छेडणाऱ्यांवर कारवाई करा

किन्हवली, ता. १४ (बातमीदार) : काही महिन्यांपासून शहापूर तालुक्यात दिव्यागांना त्रास देण्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे दिव्यांगांना त्रास देणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दिव्यांग मदत ग्रुप आणि अपंग विकास महासंघ शहापूर यांनी केली आहे. शहापूर तालुक्यातील सर्व पोलिस ठाण्यात शिष्टमंडळाद्वारे लेखी निवेदन देण्यात आले आहे.
शहापूर तालुक्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत जवळपास अडीच हजार लोकसंख्या ही दिव्यांगाची आहे. त्यात अस्थिव्यंग, दृष्टिदोष, मतिमंद, मूकबधिर, कर्णबधिर, पॅरेलिसीस, बुटकेपणा, सिकलसेल यांसारख्या २१ प्रकारात दिव्यांग आढळून येतात. दिव्यांग व्यक्तींना इतरांप्रमाणेच मानवी हक्कांचा समानतेने उपयोग घेता यावा यासाठी भारत सरकारने २८ डिसेंबर २०१६ पासून दिव्यांग व्यक्ती अधिकार कायदा अमलात आणला. यात कलम ९२ नुसार दिव्यांगांवर कोणी अन्याय, शोषण, भेदभाव, धमकी, शिवीगाळ, मारहाण, विनयभंग, त्रासदायक गोष्टी करत असेल, त्यासाठी पाच वर्षांपर्यंत कठोर शिक्षा आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा आहे. त्या अनुषंगाने दिव्यांग मदत ग्रुप शहापूर आणि अपंग विकास महासंघ शहापूर यांनी तालुका पोलिस ठाण्यासह वासिंद, किन्हवली आणि कसारा पोलिस ठाण्यात निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या वेळी दोन्ही संघटनेचे पदाधिकारी प्रकाश निचिते, विश्वजित घायवट, भालचंद्र शिर्के, बाळकृष्ण तारमळे, महिलाप्रमुख साक्षी पानसरे, मनीषा निचिते उपस्थित होते.

पोलिसांकडून दिव्यांगाकडे दुर्लक्ष होणार नाही; परंतु त्यांनीही कायद्याच्या विरोधात कोणतेही गैरवर्तणूक करू नये.
- राजकुमार उपासे, पोलिस निरीक्षक, शहापूर पोलिस ठाणे

संविधानाने दिलेल्या कायद्याचा भंग वा गैरवापर दिव्यांगामार्फत होणार नाही, असे आवाहन आमच्या संघटनेने दिव्यांगांसाठी केले आहे.
- विश्वजित घायवट, सचिव, दिव्यांग मदत ग्रुप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com