मुलांच्या उत्साहावर विरजण

मुलांच्या उत्साहावर विरजण

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. १४ ः नवी मुंबई महापालिकेच्या शाळेत प्रशासनातर्फे वाटप करण्यात येणाऱ्या गणवेश, तसेच इतर शैक्षणिक साहित्यासाठी यंदा कमालीचा उशीर होण्याची चिन्हे आहेत. कारण शिक्षण विभागाकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या गणवेशांचे वाटप झाले नसल्याने जुन्या गणवेशातच विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश करावा लागणार आहे.
एकीकडे मराठी शाळांमधील मुलांचा टक्का घसरत असताना नवी मुंबई महापालिकेच्या शाळांत मात्र विद्यार्थ्यांचा हजेरी पट दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी पालिकेने राबवलेली विविध शैक्षणिक धोरणे अधिक महत्त्वाची आहेत. पण शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सर्वोत्तम सुविधा देण्याचा डंका बजावणारी महापालिका त्यात सातत्य ठेवण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे जरी आजपासून शाळा सुरू होत असल्या तरी मुलांना जुन्या गणवेशातच प्रवेशाचा आनंद साजरा करावा लागणार आहे. यासाठी महापालिकेकडून शैक्षणिक साहित्य वाटपातील योजनांमध्ये केले गेलेले बदल कारणीभूत आहेत. त्यात आता पालिकेने डीबीटी योजना फसल्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेशासह इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी पालिकेने ई-रुपी व्हॉवचर्सचा आधार घेतला आहे, पण पालकांकडून खात्यावर आलेल्या पैशांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारींमुळे पैसे देण्याऐवजी व्हॉवचर्स देऊन शैक्षणिक साहित्य देण्याचे धोरण महापालिकेने यंदा अवलंबले आहे. मात्र, या धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षण विभाग उदासीन असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे.
------------------------------------------
महापालिकेसमोरील मुख्य आव्हान
शिक्षण विभागाकडे पालकांचे मोबाईल क्रमांक नाहीत. त्यामुळे शिक्षण विभागाला पालकांच्या मोबाईल क्रमांकावर ई-रुपीचे व्हॉवचर्स कोड पाठवता येणे शक्य होत नाही. १५ जूनला महापालिकेच्या पहिली ते ८ वी पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. या दिवशी विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या पालकांकडून शाळा व्यवस्थापनांना मोबाईल क्रमांकाची माहिती घेण्याच्या सूचना सर्व प्राथमिक आणि माध्यमिकच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार उद्या शाळेत आल्यानंतर पालकांची माहिती गोळा केल्यावर पालिकेला मोबाईलवर ई-रुपीचे व्हॉवचर्स कोड पाठवता येणार आहेत.
-------------------------------------
गणवेश वाटपाच्या बदलत्या पद्धती
- महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेचे दोन नियमित गणवेश, प्रत्येकी एक पीटी आणि स्काऊट गाईडचा गणवेश, दोन प्रकारचे बूट, दोन मौजे, एक दप्तर, वह्या, पाण्याची बाटली आणि डबा असे शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते. सुरुवातीला कंत्राटदार निवडून या वस्तूंचे वाटप केले जात होते. मात्र, बऱ्याचदा कार्यालयीन उशीर, तसेच कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे शाळा सुरू झाल्यानंतरही शैक्षणिक साहित्य मिळत नसल्याच्या तक्रारी येत होत्या.
- या पारंपरिक पद्धतीमुळे कंत्राटदारांमध्ये चढाओढ निर्माण होऊन अधिकाऱ्यांसोबत संगनमताने घोटाळा होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या. त्यामुळे अनेकदा पद्धतींमध्ये बदल करण्यात आला. कंत्राटदारांच्या पद्धतीला बगल देत मग विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा करण्याची नवी पद्धत आणली. मात्र बँक खाते उघडण्यापासून ते एकाच वेळी पैसे जमा होण्यापर्यंत आणि त्या पैशांचा विनियोगापर्यंत अनेक वाद निर्माण झाले. त्यामुळे पुन्हा नवी पद्धत नवी मुंबई महापालिका आणू पाहत आहे.
---------------------------------------------------
ई-रुपीचे व्हॉवचर्स कोड पालकांच्या मोबाईल क्रमांकावर पाठवून देण्यात येणार आहेत. हे कोड दुकानात दाखवून त्यानंतर पालकांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करता येऊ शकेल. मात्र, शिक्षण विभागाकडे पालकांचे मोबाईल क्रमांक नसल्याने यात अडचणी येत आहेत.
- यादव, शिक्षण अधिकारी, नवी मुंबई महापालिका
-------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com