बाजारात यंदा ऑटोमेटीक छत्रीची चलती

बाजारात यंदा ऑटोमेटीक छत्रीची चलती

Published on

ठाणे, ता. १८ (बातमीदार) : पावसाळ्यासाठी बाजारात दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या छत्र्या आणि रेनकोटचा ट्रेंड पाहायला मिळतो. यंदाही बाजारात छत्री आणि रेनकोटमध्ये नवनवीन प्रकार आल्याचे दिसून येत आहे. सध्या बाजारात ऑटोमॅटिक छत्री सर्वांचे लक्ष वेधत आहेत. ही छत्री बटण दाबताच उघडते आणि बटण दाबताच बंद होते. त्यामुळे या छत्रीची बाजारात सध्या चलती असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे, मुंबई तसेच उपनगरांमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे बाजारात सध्या रेनकोट, छत्र्या, पावसाळी टोप्या, ताडपत्री, प्लास्टिक पेपर आणि अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. या खरेदीसाठी ठाण्यातील जांभळी नाका, गावदेवी मैदान, नौपाडा, मीनाताई ठाकरे चौक बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत.
यंदा बाजारात रंग बदलणारी छत्री, डबल लेअर, डबल कोटेड, ऑटोमॅटिक छत्री अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या छत्र्या दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. यात आकर्षण असलेली रंग बदलणारी छत्री ही पावसात घेऊन गेल्यानंतर रंग बदलते. त्यामुळे या रंग बदलणाऱ्‍या छत्रीची सध्या बाजारात चर्चा आहे. ही छत्री खरेदी करण्याकडे ग्राहकांचा जास्त कल असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. तसेच पारदर्शक छत्र्याही सध्या बाजारात विविध प्रकारच्या छत्र्या पाहायला मिळत आहेत. या सर्व छत्र्या अगदी ३०० रुपयांपासून ते दोन हजारांपर्यंत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
----
चिमुकल्यांत कार्टून्स रेनकोटची चलती
कार्टून्स म्हणजे लहान मुलांसाठी आवडतीचा विषय आहे. आपल्या आवडत्या कार्टूनचे चित्र असणारा ड्रेस किंवा कोणतीही गोष्ट वापरणे हे प्रत्येक लहान मुलाला आवडते. यासाठी पावसाळ्यात लहान मुलांच्या रेनकोटमध्ये विविध कार्टून्सचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. यामध्ये डोरेमॉन, छोटा भीम, मोटू पटलू, स्पायडर मँन, तर लहान मुलींसाठी डोरा, बार्बीडॉल, सिंड्रेला यांचे छायाचित्र असलेले रेनकोट बाजारात उपलब्ध झाले आहेत. या रेनकोटची विक्री ३०० ते ६०० रुपयांपर्यंत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
.....
भिवंडीत ताडपत्री खरेदीची लगबग
भिवंडी (बातमीदार) : भिवंडी शहर हे कामगारांचे शहर असून येथील अनेक कामगार व गोरगरीब झोपडपट्टी अथवा चाळीमध्ये राहतात. दरवर्षी पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी ते प्लास्टिकचे छप्पर म्हणजेच ताडपत्रीचा वापर करत आहेत. शहरातील तीनबत्ती, धामणकर नाका, गायत्रीनगर आदी भागांत मोठ्या संख्येने प्लास्टिक ताडपत्रीची विक्री सुरू असून या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होते. प्लास्टिक कापडामध्ये साधे जाड स्वरूपाचे प्लास्टिक, सुती कापडाचा अंश असलेले प्लास्टिक, ताडपत्री असे विविध प्रकार असतात. सहा फूट ते बारा फूट उंचीचे प्लास्टिक बाजारात विकण्यास असून ८० रुपये मीटर ते १६०-२०० रुपये मीटरपर्यंत हे विकले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.