जे.जे रुग्णालयातील नेत्ररोग विभाग पुन्हा रुळावर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : कनिष्ठ निवासी डॉक्टर आणि वरिष्ठ डॉक्टरांमधील संघर्षानंतर जेजे रुग्णालयाचा नेत्ररोग विभाग आता पुन्हा एकदा रुळावर येत आहे. नवीन डॉक्टरांच्या नियुक्तीमुळे नेत्ररोग विभाग आता पूर्वीप्रमाणे रुग्णांना सेवा देत आहे. पूर्वीप्रमाणे येथे दररोज ३० ते ४० रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया होत असून नवीन तज्ज्ञांचे पथकही कार्यान्वित करण्यात आले आहे.
जे.जे रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारीख आणि नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या हुकूमशाहीला कंटाळून कनिष्ठ निवासी डॉक्टर संपावर गेले होते. या डॉक्टरांना तातडीने हटवावे, अशी त्यांची मागणी होती. कनिष्ठ डॉक्टरांचे हे आरोप निराधार असल्याचे सांगत डॉ. लहाने यांच्यासह सात मानद डॉक्टरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असताना डॉ. रागिणी यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. या प्रकारामुळे अनेक दिवसांपासून नेत्ररोग विभागातील शस्त्रक्रिया ठप्प झाल्या होत्या. मात्र आता या विभागात तातडीने नवीन डॉक्टरांची नियुक्ती केल्याने पुन्हा डोळ्यांच्या विविध शस्त्रक्रिया होऊ लागल्या आहेत. दरम्यान या नेत्ररोग विभागाचे नवे प्रमुख डॉ. रवी चव्हाण यांनी सांगितले की, सध्या दररोज ३० ते ४० मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया होत असून. येत्या काही दिवसांत या शस्त्रक्रियेची संख्या दुप्पट करण्याचे आमचे लक्ष्य आहे. चार नवीन मानद नेत्रतज्ज्ञांचीही नियुक्ती करण्यात आल्याचे डॉ. रवी यांनी सांगितले. यासोबतच येत्या काही दिवसांत येथे काचबिंदूची शस्त्रक्रियाही करण्यात येणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.
...................................
डोळ्यांच्या उपचारांसाठी दोन युनिट्स
लहान मुलांच्या डोळ्यांच्या उपचारांसाठी विभागात बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नेत्रचिकित्सा विभागात सध्या ८ डॉक्टरांचे पथक असून त्यात मानद डॉक्टर, प्राध्यापक आदींचा समावेश आहे. या नेत्रचिकित्सा विभागात डॉक्टरांचे एकही युनिट नव्हते; मात्र आता या विभागात डॉक्टरांचे दोन युनिट असतील, जेणेकरून अधिकाधिक रुग्णांवर उपचार करता येतील, असे त्यांनी सांगितले.
१२ वर्षात दीड लाखांहून अधिक शस्त्रक्रिया
गेल्या १२ वर्षात, जेजे रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागाने १.५ लाखांहून अधिक विविध प्रकारच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत, ज्यामध्ये नेत्रपटलासाठी २३,८७९ शस्त्रक्रिया, कॉर्नियासाठी ६,५०० शस्त्रक्रिया, ऑक्युलोप्लास्टीसाठी १,४२६ शस्त्रक्रिया आणि ८,५०० ग्लॉमा शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

