राज्यात मेडिकल टुरिझमबाबत आयएमसीने आराखडा द्यावा : लोढा

राज्यात मेडिकल टुरिझमबाबत आयएमसीने आराखडा द्यावा : लोढा

Published on

मुंबई, ता. १६ : मुंबईत व राज्यात मेडिकल टुरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्सने सर्व संबंधितांशी चर्चा करून प्रारूप आराखडा तयार करावा, अशी अपेक्षा राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी येथे व्यक्त केली. आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित ‘मेडिकल टुरिझम’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. आराखडा आपल्याला दिल्यास आपण तो मंत्रिमंडळासमोर ठेवू, असेही लोढा म्हणाले.

भारत हे मेडिकल टुरिझमचे प्रमुख ठिकाण होऊ शकते. मुंबईतही हॉस्पिटल, डॉक्टर, अत्याधुनिक उपकरणे आदी वैद्यकीय उपचारांच्या सर्वात चांगल्या सोयी आहेत. मुंबई हे मेडिकल टुरिझमचे मुख्य केंद्र करण्यासाठी सुयोग्य मार्गदर्शक तत्त्वांसह सर्वंकष धोरण हवे. त्यासाठी आयएमसी चेंबरने साह्य करावे, यावरही लोढा यांनी भर दिला. मेडिकल टुरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील मोठ्या रुग्णालयांची माहिती, उपचार, डॉक्टर यांच्या माहितीसाठी एक वेबसाईट तयार करावी, अशी सूचना आयएमसीतर्फे करण्यात आली. लोढा यांनी ती स्वीकारताना त्याची हायपर लिंक पर्यटन मंत्रालयाच्या पोर्टलवर टाकली जाईल, असे सांगितले. मात्र ही वेबसाईट विकसित करून चालवण्याचे काम आयएमसी चेंबरसारख्या जाणकारांनी केले पाहिजे, यावरही लोढा यांनी भर दिला. भारतात वैद्यकीय उपचारांच्या मोठ्या सोयी असून युरोप-अमेरिकेतील वैद्यकीय खर्चाच्या पुष्कळ कमी प्रमाणात भारतात उपचार होतात. त्यामुळे या क्षेत्रातील संधींचा व क्षमतेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने, तसेच परदेशातील भारतीय दूतावासांनी मोहीम राबवावी. यासाठी हवे तर पीपीपी भागीदारीचाही आधार घ्यावा, असेही यावेळी सुचवण्यात आले.

--
आयएमसी चेंबरतर्फे परिसंवाद
भारतीय हॉस्पिटलमधील स्वच्छता, वातावरणातील जिवाणू, उपचारांची माहिती नसणे, व्हिसा मिळण्यातील अडचणी, कुशल मनुष्यबळाची टंचाई या विषयांवरही यावेळी चर्चा झाली. या क्षेत्राच्या समस्या, तसेच माहितीची आदान-प्रदान करण्याच्या हेतूने आयएमसी चेंबरतर्फे ‘मेडिकल टुरिझम’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com