दादरच्या शिंदेवाडी मुंबई पब्लिक स्कूलला ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : पालिकेची दादर येथील शिंदेवाडी एम. पी. एस. या शाळेची ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ स्पर्धेत अव्वल दहा शाळांमध्ये निवड झाली आहे. शिक्षणासोबत मुलाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या शाळेची ब्रिटनमधील टी ४ संस्थेने दखल घेतली आहे.
‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ ही स्पर्धा ब्रिटनमधील ‘टी ४’ एज्युकेशन संस्था आयोजित करत असते. या स्पर्धेत जगभरातील शाळा सहभागी होतात. याबाबत ‘टी ४’ एज्युकेशन संस्थेने शुक्रवारी जगभरातील सर्वोत्कृष्ट शाळांची नावे जाहीर केली. या शाळांमध्ये महापालिकेच्या दादर येथील शिंदेवाडी एम. पी. एस. या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची ''वर्ल्ड बेस्ट स्कूल'' म्हणून भारतातील अव्वल दहा शाळांमध्ये निवड झाली आहे. आकांक्षा फाऊंडेशनने ही शाळा दत्तक घेतली असून, या फाउंडेशनकडून या शाळेला संपूर्ण शैक्षणिक आणि इतर उपक्रमांमध्ये सहकार्य केले जाते. पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महापालिकेचा शिक्षण विभाग नवनवीन उपक्रम राबवित आहे. या प्रयत्नांतून महापालिकेच्या दादर येथील शाळेची निवड झाली आहे. आता सप्टेंबर महिन्यात या दहा शाळांमधून तीन अव्वल शाळांची निवड करण्यात येणार आहेत.
---
मुलाच्या आरोग्याच्या काळजीची दखल
शाळेतील २५६ मुलांचे वजन कमी झाल्याचे निदर्शनास आले. या मुलांचे वय, उंची आणि वजनाच्या प्रमाणात तफावत दिसून आली; तर या २५६ पैकी १०३ मुलांचे शारीरिक वजन खूपच कमी होते. या मुलांच्या पालकांचे शाळेने भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आयसीएमआर) या संस्थेकडून प्रबोधन केले. त्यांच्या आहाराविषयी पालकांमध्ये जनजागृती केली. तसेच वजन कमी असलेल्या मुलांची आरोग्य पञिका (हेल्थकार्ड) बनवून त्यावर दैनंदिन नोंदी घेण्यात आल्या. दर तीन महिन्यात या मुलांची आरोग्य तपासणी शाळेकडून करण्यात आली. माध्यान्ह भोजनासह मुलांच्या आहारात फळांचाही समावेश करण्यात आला. मुलांच्या आरोग्यासाठी शाळेने राबवलेल्या या उपक्रमाची ब्रिटनमधील टी ४ संस्थेने दखल घेत शाळेची निवड केली असल्याचे मुख्याध्यापिका साक्षी भाटिया यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

