निर्देशांकांचा सर्वकालिक उच्चांक
मुंबई, ता. १६ ः जागतिक शेअर बाजारांमधील अनुकूल संकेतांचा फायदा घेत गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्यामुळे आज सेन्सेक्स व निफ्टी यांनी बंद स्तरावरचा सार्वकालिक उच्चांक नोंदवला. आज सेन्सेक्स ६३,३८४.५८ अंश; तर निफ्टी १८,८२६ अंशावर बंद झाला. आजच्या तेजीमुळे गुंतवणूकदार दोन लाख कोटी रुपयांनी श्रीमंत झाले.
आता निफ्टी आपल्या सार्वकालिक उच्चांकापासून ६३ अंश मागे आहे. यापूर्वी १ डिसेंबर रोजी निफ्टी व सेन्सेक्सने बंद स्तरावर सार्वकालिक उच्चांक नोंदवला होता. तो विक्रम आज शेअर बाजार निर्देशांकांनी तोडला. आज सेन्सेक्स ४६६.९५ अंश तर निफ्टी १३७.९० अंशांनी वाढला. आजच्या तेजीमुळे गुंतवणुकदार २.०७ लाख कोटी रुपयांनी श्रीमंत झाले. मुंबई शेअर बाजारातील सर्व गुंतवणूकदारांच्या एकूण शेअरचे मूल्य गुरुवारी २९०.७ लाख कोटी रुपये होते; तर आज दिवसअखेरीस ते २९२.८ लाख कोटी रुपये झाले.
अमेरिकेतील सर्वसामान्य ग्राहकांची खरेदी अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचा तपशील आल्यामुळे आज जागतिक स्तरावर सर्वत्र उत्साह होता. या तपशिलामुळे तेथील अर्थव्यवस्थेची वाढ झाल्याचे जाणवल्याने गुंतवणूकदारांनी सर्वत्र खरेदी केली; तर त्याचबरोबर अमेरिकेतील बेकारांची संख्या वाढल्यामुळे व्याज दरवाढीचे सत्र थांबण्याची शक्यता निर्माण झाल्याने गुंतवणूकदार उत्साही होते. दुसरीकडे केंद्राने मुडी या मानांकन संस्थेची चर्चा केल्याने भारताचे मानांकन वाढेल, अशा अपेक्षेत बाजारात उत्साह होता. शेअर निर्देशांकांच्या फेरमूल्यांकनात अनेक बड्या शेअरचे वजन वाढल्यामुळे भारतात जास्त निधी येण्याचीही शक्यता होती. या सर्वांचा परिणाम आज भारतातही सपाटून खरेदी झाली.
---
या शेअर्समध्ये चढउतार
आज सेन्सेक्समधील प्रमुख ३० पैकी २६; तर निफ्टीच्या मुख्य ५० पैकी ३८ शेअरचे भाव वाढले होते. आज बँकिंग, औषधनिर्मिती, ग्राहकोपयोगी वस्तू आदींच्या शेअरचे भाव वाढले होते; तर आयटी शेअरचे भाव कमी झाले. बीएससीवर विप्रो, टीसीएस या शेअरचे भाव सव्वा ते दोन टक्के कमी झाले. टेक महिंद्र या शेअरचा भावही घसरला; तर बजाज फिनसर्व्ह, टायटन, कोटक बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, आयटीसी, एचडीएफसी, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक, एअरटेल, महिंद्र आणि महिंद्र या शेअरचे भाव एक ते दोन टक्का वाढले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

