बालविवाह रोखणे ही सामाजिक जबाबदारी
डहाणू, ता. १६ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात अनुसूचित जाती-जमातीमध्ये बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे. त्यासाठी शाळेतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा उपयोग करून घेतला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने, ही सामाजिक जबाबदारी समजून बालविवाह रोखण्यासाठी पोलिसांना कळविले पाहिजे. बालविवाह रोखणे ही सामाजिक व राष्ट्रीय जबाबदारी असल्याचे प्रतिपादन पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केले.
डहाणू येथील दशाश्री माळी सभागृहात डहाणू पोलिसांतर्फे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतील जनसंवाद अभियानाअंतर्गत, बालविवाहाचे दुष्परिणाम व बालविवाह केल्याने महिलांवर होणारे दुष्परिणाम, याबाबत जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या वेळी पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील बोलत होते. याप्रसंगी डहाणू उपविभागीय पोलिस अधिकारी संजीव पिंपळे, सहायक जिल्हाधिकारी रोहन कुवर, नायब तहसीलदार संतोष ढेरे, डहाणू पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर, डॉ. राजेंद्र तिवारी, ॲड. संयुक्ता तामोरे यांच्यासह शेकडो नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
प्रारंभी डहाणू पोलिसांमार्फत पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना वारली चित्र भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या वर्षी पोलिस भरती झालेल्या उमेदवारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे या वर्षी पोलिस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुस्तकाचे वाटप करण्यात आले. तसेच उत्तेजित डफरिया यांच्या अन्नपूर्णा फाऊंडेशनतर्फे प्राथमिक उपचारासाठी उपयोगी पडणाऱ्या ११२ कीटचे वाटप पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
--------------
भटजी, डेकोरेटर्सवालेही जबाबदार
विवाहाप्रसंगी अल्पवयीन मुलीला शारीरिक भान नसते. बालवयात गर्भधारणा झाल्यामुळे शिक्षण घेऊन खेळण्याच्या वयातच त्या मुलीवर जबाबदारी येऊन पडते. त्यामुळे तिच्या शरीरात अनेक व्याधी निर्माण होऊन बालमाता मृत्यूच्या प्रमाणात वाढ होते. अज्ञानामुळे मुलीचे वय १८ वर्षे होण्यापूर्वी विवाह होतो. त्यामुळे उपस्थित असणारे लोक, भटजी, मंडप डेकोरेटर्सवाला, विवाहासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल होऊन त्यांना दोन वर्षे कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने बालविवाह रोखून अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले पाहिजे. त्याची सुरुवात स्वतःपासून करायची आहे, असे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
-----------
बालविवाहाची माहिती देण्याची शपथ
या वेळी डहाणू पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी, मोबाईलवर येणाऱ्या मेसेजची खातरजमा न करता तो इतरांना फॉरवर्ड केला जातो. त्यामुळे समाजात गैरसमज पसरून त्याचे वाईट पडसाद उमटतात. त्यामुळे अनुचित प्रकार घडतात, असे डहाणू पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी सांगितले. या वेळी पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी उपस्थिताना, माझ्या गावात किंवा आजूबाजूच्या गावात कुठेही बालविवाह होत असेल तर मी पोलिसांना माहिती देईन, अशी शपथ दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

