चाकांबरोबर नशिबाचेही फिरते चक्र

चाकांबरोबर नशिबाचेही फिरते चक्र

Published on

वाशी, ता. १८ (बातमीदार)ः वेळेत माल पोहोचविण्यासाठी रात्रंदिवस धावपळ, ना झोपण्याची वेळ ना खाण्या-पिण्याची. कधी कोणते संकट येईल याचा नेम नाही, सगळेच काही अनिश्चित. त्यामुळे संपूर्ण आयुष्यच रस्त्यावर जात असल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे, पण कुटुंबीयांनाही पुरेसा वेळ देता येत नसल्याची खंत ट्रकचालकांनी व्यक्त केली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून दररोज दीड ते दोन हजार ट्रक कृषी माल घेऊन येत असतात. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणासह विविध राज्यांतील कृषी माल विक्रीसाठी घेऊन येताना ट्रकचालक चोवीस तास राबत असतात. त्यामुळे या ट्रकचालकांसमोर विविध अडचणींचा डोंगर आहे. दिवस-रात्र गाडी चालवायची, वेळेत जेवण मिळत नाही. दिवसा मिळेल त्या हॉटेलवर जेवायचे, रात्री गॅसवर स्वत: बनवून खायचे. कधी दिवसातून एकदाच जेवायचे, अशी स्थिती या चालकांची झाली आहे. अनेकदा दोन-तीन महिने घरी जाता येत नाही. त्यामुळे ट्रकचालकांना आयुष्यात दररोज विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने उन्हाळा, पावसाळा, हिवाळा बदलत्या ऋतूप्रमाणे समस्याही बदलत असल्याचे मध्य प्रदेशमधून आलेला नरेश त्रिपाठी सांगतो.
------------------------------------
ट्रकचालकांसमोरील अडचणी
- कधी गाडी बंद पडते, कधी अपघात होतो. कधी पोलिस कारवाईला सामोरे जावे लागते. माल पोहोचविण्यासाठी वेळ झाला तर त्याचा दोष सहन करावा लागतो. माल खाली केल्यानंतर पुन्हा भाडे मिळेपर्यंत वाट पाहावी लागते. त्यामुळे गैरसोयी चालकांच्या पाचवीलाच पूजलेल्या असतात.
- ट्रकचालकाला देशाच्या कानाकोपऱ्यात जावे लागते. कधी कधी एक महिना घरी जाता येत नाही. रोज शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. रात्रंदिवस गाडी चालविल्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. पुरेसा आहार तसेच झोप मिळत नसल्यामुळे डोळ्यांचे, पाठीचे आजार जडतात.
------------------------------------------
ट्रकचालकांचे आयुष्य रस्त्यावर सुरू होते तसे ते रस्त्यावरच संपते. रोज विविध अडचणींना सामोरे जावे लागते. कधी अपघात तर कधी पोलिस कारवाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे माल पोहोचवण्यासाठी विलंब झाल्यास त्यासाठी चालकालाच जबाबदार धरले जाते.
- राजेश सिंग, ट्रकचालक, उत्तर प्रदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.