पाण्यासाठी भावनांचा भडका

पाण्यासाठी भावनांचा भडका

Published on

खारघर, ता. १८ (बातमीदार) : तळोजा वसाहतीत गेल्या तीन दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. अनेक भागांमध्ये पाणीच येत नसल्याने टँकरचे पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू आहे. त्यामुळे तळोजामधील प्रश्‍न सुटण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असल्याने नागरिकांच्या भावनांचा भडका उडत आहे.
तळोजा वसाहतीत एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो. गुरुवारी पंधरा-वीस मिनिटे पाणीपुरवठा झाला, तर शुक्रवारी शटडाऊन असल्यामुळे पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पिण्याचे पाणी नसल्यामुळे याबाबत सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे नागरिकांकडून विचारणा करण्यात येत आहे. यावेळी खारघरमधून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन सिडकोकडून देण्यात आले. मात्र, पाणीपुरवठा झाला नसल्यामुळे तसेच सिडको अधिकाऱ्यांशी संपर्क होत नसल्याने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट शिर्के कंपनीच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनाच घेराव घातला होता. यावेळी नागरिकांनी शिर्के कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे विनंती करून टँकर पुरवण्याची मागणी केली. तसेच सिडकोकडून पाणी मिळत नसल्याने तळोजा एमआयडीसीमधून बोअरवेलच्या पाण्यासाठी पैसे मोजण्याची देखील तयारी दर्शवली होती.
-----------------------------------
महिलांचा अधिकाऱ्यांना घेराव
तळोजा फेज दोनमधील सिडकोच्या गृहनिर्माण सोसायटीत पाणी नसल्यामुळे ३० ते ४० महिलांनी शिर्के कंपनीच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. यावेळी पाणीपुरवठा नसल्यामुळे होणाऱ्या अडचणी सांगून टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच अचानक मोठ्या संख्येने महिला जमा होत असल्याचे निदर्शनास येताच शिर्के कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थेट सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क करून टँकरने पाणी पुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले आहे.
-------------------------------------
बोअरवेलच्या पाण्यावर मदार
तळोजा वसाहतीमधील पाणी समस्या सोडविण्यासाठी सिडकोने फेज एक आणि दोनमधील जलकुंभातून पाणी पुरवठ्याचे आश्वासन रहिवाशांना दिले होते. मात्र, प्रश्‍न सुटण्याऐवजी अधिक गंभीर होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. घरात थेंबभर पाणी नसल्यामुळे अनेकांना बोअरवेलच्या पाण्यावर तहान भागवावी लागली, तर काहींना विकतचे पाणी घेऊन गरजा पूर्ण कराव्या लागल्या.
--------------------------------------------
तळोजा फेज दोनमध्ये पाणीटंचाई आहे. त्यामुळे नागरिकांवर हंडा, कळशी घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सध्या सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडून टँकरने पाणीपुरवठा होत आहे.
- भीम चव्हाण, रहिवासी, तळोजा फेज दोन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.