मुंबई ठाण्यासह १९ जिल्ह्यांत कॅथ लॅब सुरू , ७ लाख लोकांचे ईसीजीचे लक्ष्य

मुंबई ठाण्यासह १९ जिल्ह्यांत कॅथ लॅब सुरू , ७ लाख लोकांचे ईसीजीचे लक्ष्य

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : हृदयविकाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मुंबई, ठाण्यासह विविध जिल्हा रुग्णालयांमध्ये हृदयविकारावरील उपचारांसाठी १९ कॅथ लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन ते अडीच वर्षांत ही कॅथ लॅब सुरू होण्याची शक्यता आहे. या कॅथ लॅबसोबतच, आरोग्य विभागाने आपल्या स्टेमी प्रकल्पाचा संपूर्ण ३४ जिल्ह्यांमध्ये विस्तार करून यावर्षी ७ लाख ईसीजीचे लक्ष्य ठेवले आहे.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये राज्य विमा योजनेतून २३३ कोटी रुपयांचा अतिरिक्त अर्थसंकल्पीय निधी कसा खर्च करायचा, यावर झालेल्या अनेक चर्चेनंतर हा निर्णय घेतला होता. सुरुवातीला चार रेडिओथेरपी युनिट तसेच १९ कॅथ लॅबसाठी पैसे खर्च करण्याची तयारी केली होती; परंतु रेडिओ थेरपी केंद्रांवर उपलब्ध निधीपेक्षा जास्त खर्च होत असल्याचे एका चौकशीतून समोर आल्याने हा निधी कॅथ लॅबवरच खर्च करण्याचा निर्णय घेतला.

प्रत्येक कॅथ लॅबची किंमत १४.५ कोटी रुपये
कॅथ लॅबसाठी काही महिन्यांत त्यासाठी उपकरणे खरेदी करण्यासाठी निविदा काढणार असल्याचे राज्याचे आरोग्य सेवा संचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले. एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, एक कॅथ लॅब सुरू करण्यासाठी सुमारे १४.५ कोटी रुपये खर्च येतो.

जिल्हा रुग्णालयांत विशेष सेवांचा अभाव
वरिष्ठ डॉक्टरांच्या मते, राज्यात आधीच २० हून अधिक सुपरस्पेशालिटी रुग्णालये आहेत, जिथे अँजिओप्लास्टी आणि हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया इत्यादी केल्या जातात; मात्र जिल्हा रुग्णालये अशी विशेष सेवा देत नाहीत; मात्र ग्रामीण भागातही हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत असल्याने जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅथ लॅब सुरू करण्याची गरज भासू लागली आहे.

स्टेमी प्रकल्पाचा पुढचा भाग म्हणजे कॅथ लॅब
आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, कॅथलॅब ही एसटी एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फेक्शन प्रकल्पांचा पुढचा टप्पा आहे. हा प्रकल्प २०२० मध्ये सुरू झाला. सार्वजनिक केंद्रांत छातीत दुखत असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका शोधणे, हा त्यामागचा उद्देश आहे.
..................................
५ लाख लोकांचे ईसीजी
सुवर्ण तासात हृदयविकाराचा झटका शोधून त्यावर उपचार करण्यासाठी स्टेमी कार्यक्रम सुरू करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने एका खाजगी आरोग्य सेवा कंपनीशी करार केला होता. २०२० मध्ये १२ जिल्ह्यांत याची सुरुवात झाली. याअंतर्गत १४८ उपजिल्हा रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य केंद्रांत १४८ छोटी केंद्रे सुरू केली. छातीत दुखत असल्याची तक्रार घेऊन येथे आलेल्या लोकांचा ईसीजी करण्यात आला आणि ईसीजीमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आढळल्यास त्यांना तात्काळ सरकारी व खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. २०२० ते मे २०२३ पर्यंत पाच लाखांहून अधिक ईसीजी केले आहेत. त्यापैकी ४,३२९ जणांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाल्यानंतर जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत उपचार करण्यात आले.
......................................
येथे कॅथ लॅबची व्यवस्था
मुंबई (उपनगर), ठाणे, रत्नागिरी, पुणे, जालना, अहमदनगर, धुळे, बीड, हिंगोली, बुलढाणा, परभणी, गडचिरोली, भंडारा, कराड, औरंगाबाद, वर्धा, वसीम, नांदेड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॅथ लॅब सुरू करण्यात येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com