मिरा-भाईंदरमध्ये पीओएस यंत्राद्वारे करवसुली

मिरा-भाईंदरमध्ये पीओएस यंत्राद्वारे करवसुली

Published on

भाईंदर, ता. ३ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महानगरपालिकेचा मालमत्ता कर आता अधिक हायटेक झाला आहे. या विभागाची संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) नुकतीच अद्ययावत करण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांना आता नावाने देखील मालमत्ता कराचे देयक संकेतस्थळावरुन शोधता येणार आहे. तसेच ते देयक डाऊनलोड देखील करता येणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन पीओएस यंत्राद्वारे कराची वसुली करणार असून त्याची पावती देखील तत्काळ मिळणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून रात्रंदिवस जागून महापालिकेचे सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यात आले आहे. बँक ऑफ बडोदाने नवे सॉफ्टवेअर महापालिकेला मोफत दिले आहे. सोबतच महापालिकेला प्रायोगिक तत्त्वावर २० पीओएस यंत्रेदेखील मोफत दिली आहेत. एरवी कोणत्याही दुकानात पीओएस यंत्रावर आपण जसे कार्ड स्वाईप करून पैसे भरतो त्याच पद्धतीने हे यंत्र काम करणार आहे. महापालिकेचे कर्मचारी हे यंत्र घेऊन घरोघरी जाणार आहेत किंवा एखाद्या संकुलात कर वसुलीसाठी शिबिर आयोजित केले जाणार आहे. याआधी पैसे भरल्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये पावती तयार होण्यास एक ते दीड मिनीट लागत होते मात्र आत अवघ्या दहा सेकंदात पावती तयार होणार असून करदात्याला ती लगेचच मिळणार आहे. शिवाय करदात्याच्या मोबाईलवरही कर भरल्याचे तत्काळ एसएमएसही जाणार आहे.

अशी आहे यंत्रणा
पीओएस यंत्रात डायनॅमिक क्युअर कोड देखील असणार आहे. हा कोड स्कॅन करून पेटीएम, गुगल पे अथवा फोन पे द्वारेही कर भरणे शक्य आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन नागरिकांना मालमत्ता कर विभागात आपल्या नावाने शोध घेऊन आपले कर देयक डाऊनलोड करता येणार आहे तसेच पावती देखील डाऊनलोड करता येणार आहे. याआधी त्यासाठी मालमत्ता क्रमांक नमूद करावा लागत असे. परंतु अनेकांना मालमत्ता क्रमांक ठाऊक नसल्यामुळे आता केवळ नावाने सुद्धा देयक शोधता येणार आहे. सॉफ्टवेअर अद्ययावत झाल्यामुळे कर विभागाचे काम अधिक गतिमान होणार आहे व नागरिकांनाही अधिक सुविधा उपलब्ध होणार आहे अशी माहिती आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली.

अधिकाऱ्‍यांसाठी मोबाईल ॲप
सॉफ्टवेअरचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की त्याच्या मदतीने महापालिकेने कर विभागाशी संबंधित अधिकाऱ्‍यांसाठी मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपद्वारे स्वत: आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आदींना रोजच्या करवसुलीवर लक्ष ठेवणे सहज शक्य होणार आहे. दररोज कोणत्या प्रभाग किती वसुली झाली याचा दैनंदिन आढावा मोबाईलवर घेता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.