अनिल अंबानी यांची ईडीकडून चौकशी

अनिल अंबानी यांची ईडीकडून चौकशी

Published on

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३ : परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) उल्लंघनप्रकरणी रिलायन्स समूहाचे प्रमुख उद्योगपती अनिल अंबानी यांची आज मुंबईत ईडीने चौकशी केली. सकाळी ११ च्या सुमारास अनिल अंबानी मुंबईच्या बॅलार्ड इस्टेट भागात असलेल्या ईडी कार्यालयात पोहोचले. तब्बल सात ते आठ तासांनंतर ते कार्यालयातून बाहेर पडले. अंबानी यांची यापूर्वी २०२० मध्ये येस बँकेचे प्रवर्तक राणा कपूर आणि इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.

रिलायन्स एडीए समूहाच्या वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे अनिल अंबानी यांनी दिवाळखोरी असल्याचा दावा केला होता. या कर्जाची रक्कम २०१९ मध्ये १.२० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. मालमत्ता विक्रीद्वारे निधी उभारण्याचे प्रयत्न करूनही रिलायन्स कम्युनिकेशन्सला कर्ज भरण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे फेब्रुवारी २०१९ मध्ये कंपनीने दिवाळखोरीसाठी अर्ज केला. फेब्रुवारी २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अनिल अंबानी यांना त्यांच्या ५५० कोटी रुपयांच्या कर्जापैकी ४५३ कोटी रुपये स्वीडिश कंपनी एरिक्सनला देण्याचे आदेश दिले; परंतु अंबानी कर्ज परतावा करण्यास अयशस्वी ठरले.

यानंतर न्यायालयाने त्यांना एरिक्सनची थकबाकी देण्याच्या मागील आदेशाचे पालन न केल्याबद्दल अवमानासाठी दोषी ठरवले आणि त्यांना आणि कंपनीच्या दोन संचालकांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ४२० कोटी रुपयांच्या करचोरी प्रकरणात अनिल अंबानी यांना काहीसा दिलासा दिला होता. त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये, असे न्यायालयाने आयकर विभागाला सांगितले होते. यानंतर एप्रिल महिन्यातही उच्च न्यायालयाने हाच आदेश देताना अनिल अंबानींचा दिलासा कायम ठेवला होता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.