वसई मध्ये रानभाज्याचे प्रदर्शन

वसई मध्ये रानभाज्याचे प्रदर्शन

विरार, ता. ६ (बातमीदार)ः वसई येथे प्रथमच पालिकेकडून शहरवासीयांसाठी रानभाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. या प्रदर्शनामध्ये नागरिकांनी उपस्‍थित राहावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
पावसाळा सुरू झाला असून या दिवसात रानात अनेक प्रकारच्या भाज्या उगवतात. त्यातून आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध होत असतो; मात्र या रानभाज्या शहरातील नागरिकांना माहिती नसतात. या भाज्यांची माहिती व्हावी, त्याचबरोबर या प्रदर्शनाच्या माध्यमातून आदिवासी महिलांना रोजगार मिळावा, या उद्देशाने वसई-विरार शहर महानगरपालिका, वसई तालुका पत्रकार संघ आणि समाज मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वसईमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन शनिवार ८ जुलै रोजी समाज मंदिर हॉल, वसई येथे सकाळी १० ते ५ च्यादरम्यान आयोजित केले आहे. वसईमध्ये रानभाज्यांचे अशा प्रकारचे प्रदर्शन प्रथमच होत असल्याने याबाबत नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे. या प्रदर्शनात वास्ते व शिंद, दिंडे, शेवली, तेरा, टाकळा, लोत व करडी, कोयरेल, आळवा, अंबाडे, केळीचे बोन्ड अशा भाज्यांचा समावेश असणार आहे. या भाज्या श्रमजीवी संघटनेच्या महिला थेट रानातून आणणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून माजी महापौर प्रवीणा ठाकूर, माजी महापौर प्रवीण शेट्टी व माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज उपस्थित राहणार आहेत. सोबत पालिका आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार, समाज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नितीन म्हात्रे आणि वसई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप पंडित उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com