आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या टप्प्यात २१८ विद्यार्थ्यांचा प्रवेश

आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या टप्प्यात २१८ विद्यार्थ्यांचा प्रवेश

Published on

ठाणे, ता. ६ (बातमीदार) : आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३-२४ करिता दुसऱ्या प्रतीक्षा यादीत ९६६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यापैकी २१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याची माहिती आरटीईच्या अधिकृत संकेत स्थळावर नोंदविण्यात आली आहे. दुसऱ्या यादीतील प्रवेश प्रक्रिया ७ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. या जागांवर किती विद्यार्थी प्रवेश घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत आरटीई अंतर्गत एकूण ८ हजार ७८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे.

वंचित गटातील आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत २५ टक्के आरक्षित जागांवर ऑनलाईन प्रवेश दिला जातो. २०२३-२४ ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके व सहा महापालिका क्षेत्रातील आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाकरिता प्रतीक्षा यादी २ ची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये ९६६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या यादीतील आतापर्यंत २१८ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला असल्याची माहिती आरटीईच्या अधिकृत संकेत स्थळावर देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रियेचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे किती विद्यार्थी या जागांवर प्रवेश घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाणे जिल्ह्यात पाच तालुके आणि सहा महापालिका क्षेत्रात यंदा आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ६२९ शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये १२ हजार २६३ जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी जिल्ह्यातील ३१ हजार ६५१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी पहिल्या निवड यादीत १० हजार ९९६ विद्यार्थ्यांची निवड झाली. यापैकी ७ हजार १२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ५ हजार २५१ जागा शिल्लक होत्या. प्रतीक्षा यादीच्या पहिल्या टप्प्यात उर्वरित जागांसाठी प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये २ हजार ९७५ बालकांची निवड करण्यात आली होती, त्यापैकी केवळ १ हजार ५५८ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत आरटीई अंतर्गत एकूण ८ हजार ७८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून अद्यापही ३ हजार ४७५ जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया ७ जुलैपर्यंत सुरू असून यामध्ये आणखी विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील, अशी माहिती ठाणे जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.