इमारत पुनर्विकासातील वाद, अडचणींवर चर्चा

इमारत पुनर्विकासातील वाद, अडचणींवर चर्चा

बदलापूर, ता. ६ (बातमीदार) : विकसकांची भागीदारीतील भांडणे, परिणामी होणारी ताटातूट, सोसायटी कमिटीमधील वाद, बोगस कागदपत्रे, अनधिकृत जागेतील बांधकाम, या अशा अनेक कारणांमुळे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात अनेक अडचणी निर्माण होतात. परिणामी या इमारतींची पुनर्बांधणी रखडते. हीच समस्या ओळखून आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त सहकार भारती बदलापूरने जुन्या इमारतींचा पुनर्विकास- तंटामुक्त अभियान, दैनंदिन कामकाज व शंका-समाधान यावर मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. बदलापूर पश्चिम अजय राजा हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

इमारतींच्या पुनर्विकासात व कायदेशीर बाबीत येणाऱ्या अडचणी, सोसायटीधारकांच्या समस्या, शंका सोडवण्यासाठी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून अंबरनाथ-बदलापूर विभागाचे सहायक निबंधक रामचंद्र लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. मुख्य म्हणजे शहरात अनेक सोसायट्यांत अंतर्गत वाद होतात अन् हे वाद अक्षरशः न्यायालयात गेले आहेत, अशी प्रकरणे प्रामुख्याने समोर येत आहेत. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ठाणे जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील व माजी नगराध्यक्ष तथा शहरातील भाजप गटनेते राजेंद्र घोरपडे, भाजप शहराध्यक्ष शरद तेली, माजी नगरसेवक संभाजी शिंदे, किरण भोईर, रमेश सोळसे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. या वेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन व त्यांचे प्रश्न योग्यरीत्या मांडण्याचे काम या वेळी आयोजक दिनेश कथोरे यांनी केले.

लोकसंख्यावाढीत बदलापूर शहर हे अग्रेसर आहे. त्यामुळे शहरात होत असलेली विकासकामे तसेच सोयी-सुविधांवर भार पडत आहे; मात्र यातून नवीन इमारतींमध्ये घरे घेताना अडचणी, जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अशा अनेक अडचणी रोज माझ्यासमोर येतात. या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन बदलापूर शहर हे तंटामुक्त व्हावे व शहरातील इमारती व पुनर्विकासासंदर्भात नागरिकांच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी हे शिबिर घेतले.

किसन कथोरे, आमदार, मुरबाड विधानसभा मतदारसंघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com