रेल्वे स्थानकात छत्रीचा आधार

रेल्वे स्थानकात छत्रीचा आधार

Published on

वाशी, ता. ६ (बातमीदार)ः ठाणे, वाशी, पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वेस्थानकातून लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पावसाबरोबरच रेल्वेस्थानकात छत गळतीला सामोरे जावे लागत आहे. रेल्वेस्थानकात आलेल्या प्रवाशांना बसण्यासाठी असणारी आसन व्यवस्था चिंब भिजल्याने ताटकळत उभे राहावे लागत आहे. जोरदार पाऊस झाल्यास फलाटावरील गळतीमुळे चक्क छत्रीचा आधार घ्यावा लागत आहे.
नवी मुंबई शहराला आठवडाभरापासून पावसाने चांगलेच झोडपले आहे. पावसामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर नागरिकांना खड्डे आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता रस्त्याबरोबरच लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दुहेरी त्रास सोसावा लागत आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर सिडकोने उभारलेल्या ऐरोली, कोपरखैरणे, तुर्भे, घणसोली, जुईनगर या रेल्वेस्थानकांत पावसाळ्यात छत गळती, भुयारी मार्गात पाणी साचणे, असे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे प्रवाशांना सिडकोच्या दुर्लक्षितपणाचा भार दरवर्षीप्रमाणे यंदाही सोसावा लागत आहे. जून महिन्याच्या अखेरपासून सुरू झालेल्या पावसामुळे ऐरोली रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक-१ व २ वरील प्रवाशांना गळक्या छतातून फलाटावर पडलेल्या पावसातून वाट काढत आडोसा पकडावा लागत आहे. कोपरखैरणे तसेच घणसोली रेल्वेस्थानकात फलाटावर जाणाऱ्या मार्गात पाणी साचले होते, तर चढण्या-उतरण्याच्या पायऱ्यांवर पाणीच पाणी होते. यासंदर्भात सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
--------------------------------------------
रेल्वे, सिडकोचे एकमेकांकडे बोट
ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वेस्थानके सिडकोने उभारली आहेत. रेल्वे लाईन आणि इंडिकेटर, तिकीट खिडकी या सुविधा रेल्वेने पुरवल्या आहेत. काही वर्षांपासून ट्रान्स हार्बर मार्गावरील सिडकोने बांधलेली रेल्वेस्थानके रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया केली नसल्याने त्याची डागडुजी करायची कोणी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सिडको मात्र याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात रेल्वे प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
------------------------------------------------
पावसाळ्यामध्ये ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वेस्थानकांना गळती लागत असते. त्यामुळे प्रवाशांना भर पावसामध्ये छत्रीचा आधार घेत रेल्वेस्थानकात यावे लागते.
- सागर कांबळे, प्रवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.