लोकलमधील महिला सुरक्षा मजूबत करण्याची गरज!

लोकलमधील महिला सुरक्षा मजूबत करण्याची गरज!

Published on

मुंबई, ता. ६ ः मुंबई लोकलसह रेल्वेमधील महिलांविरोधी गुन्हे रोखण्यासाठी रेल्वे आणि स्थानिक पोलिसांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. धावत्या रेल्वेत महिलांवर अतिप्रसंग करणाऱ्या गुन्हेगारांना तातडीने घटनास्थळी पकडण्याच्या दृष्टीने रेल्वे पोलिसांनी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले. रेल्वे प्रवासादरम्यान जखमी झालेल्या किंवा अतिप्रसंगाला बळी पडलेल्या महिलांना वैद्यकीय उपचार आणि आर्थिक मदत कशी उपलब्ध होईल यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशा सूचना गोऱ्हे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या.

लोकलमध्ये अलीकडे महिला अत्याचाराच्या काही घटना समोर आल्या. त्या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांची सुरक्षा आणि त्यावर रेल्वे प्रशासनाच्या उपापयोजना अशा सर्वांचा आढावा घेण्यासाठी गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळात एक महत्त्वाची बैठक झाली. बैठकीला गृहविभाग आणि रेल्वेचे वरिष्ठ पोलिस अधिकारी व दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते.

बेकायदा प्रवासी
रेल्वेत घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांमध्ये विशेषतः महिलांची छेडछाड करणारे गुन्हेगार बेकायदा रेल्वे आवारात प्रवेश करतात. रेल्वे मार्गावरून ते काही भागांतून स्थानकात शिरतात. गर्दुल्ले आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा त्यात समावेश असतो. तिकिटाशिवाय स्थानकावर भटकणाऱ्या अशा प्रवाशांना अटकाव केल्यास रेल्वेमधील महिलांविरुद्ध गुन्हे कमी होतील, असे रेल्वे आयुक्त प्रज्ञा सरवदे यांनी सांगितले. सदर गुन्हेगार प्रवेश मार्गिकेवरील सीसीटीव्ही यंत्रणांच्या रेकॉर्डवर येतील, असे म्हणणेही त्यांनी मांडले.

रेल्वेच्या उपाययोजना
सीसीटीव्ही यंत्रणा आणि फेस रीडिंग अद्ययावत कॅमेरे बसवण्याचे काम सुरू असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. सर्व स्थानकांभोवती सुरक्षा भिंत बांधण्याचे नियोजन असल्याचेही सांगण्यात आले. महिला प्रवाशांच्या डब्यात सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू आहे. त्यासोबत टॉक बॅक यंत्रणेसोबत इतर अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ पोलिस अधिकारी ऋषी शुक्ला यांनी दिली. त्याशिवाय टोल फ्री क्रमांकावर आलेल्या महिला तक्रारींचा तातडीने निपटारा होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दक्षता समितीशी समन्वय
रेल्वेत महिला सुरक्षेच्या मोहिमेत दक्षता समितीच्या सदस्यांना सामावून घ्यावे, अशा सूचनाही नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. अशा सदस्यांचा रेल्वे प्रवाशांशी जनसंपर्क असतो. त्यामुळे प्रत्येक रेल्वे पोलिस स्थानकामध्ये सदस्यांची नावे व फोन नंबर दर्शनी भागात लावल्यास संकटकाळात महिला प्रवासी तातडीने त्यांच्याशी संपर्क साधू शकतील. रेल्वे पोलिस आणि दक्षता समिती सदस्यांचा एकत्रित व्हॉटस्ॲप ग्रुप तयार केल्यास अनेक घटनांच्या माहितीचे आदानप्रदान तातडीने होऊ शकेल, असेही गोऱ्हे यांनी सांगितले.

नीलम गोऱ्हे यांच्या सूचना
- महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देणे
- बेकायदा प्रवाशांवर तात्काळ कारवाई करणे
- अपघात किंवा छेडछाड झालेल्या पीडितेचे पुनर्वसन आणि वैद्यकीय मदत
- टोल फ्री क्रमांकावरील तक्रारींवर तातडीने कारवाई करा
- स्वच्छतागृहात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे
- माता व बालकांसाठी रेस्ट रूमची व्यवस्था

रेल्वे पोलिसांच्या अडचणी
- निर्भया फंडातून रेल्वे पोलिसांना निधी मिळत नाही
- प्रशिक्षित होमगार्डची अपुरी संख्या
- नव्या रेल्वे पोलिस ठाण्याचा प्रस्ताव प्रलंबित
- सर्वच ठिकाणी सीसीटीव्हीची सोय नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.