गगनचुंबी इमारतींमध्ये रुबाबदार वाडा

गगनचुंबी इमारतींमध्ये रुबाबदार वाडा

Published on

शुभांगी पाटील, तुर्भे
‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनचुंबी इमारतीच्या भाऊगर्दीत आजही करावे गावातील तांडेल वाडा इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलेल्या करावे गावच्या तांडेल घराण्याची ओळख या वाड्याने आजही जपली आहे.
------------------------------------
पत, पैसा आणि कला या सहसा एकत्र नांदत नाहीत; परंतु तांडेल घराण्यात मात्र त्या हातात हात घालून नांदताना दिसतात. धर्माजी तांडेल हे या कुटुंबाचे मूळकर्ते पुरुष. या कुटुंबात मागील सुमारे दोनशे वर्षांत बुधाजी धर्माजी, त्रिंबक बुधाजी, गणपत त्रिंबक, मधुकर गणपत अशी अनेक कर्तबगार माणसे जन्माला आली. १७७० च्या सुमारास या कुटुंबातील कुटुंबप्रमुख बुधाजी धर्मा तांडेल यांनी विस्तीर्ण अशा एक एकरात भव्य-दिव्य असा वाडा बांधला. सागवान लाकडाचे कोरीव व नक्षीकाम असलेला हा वाडा आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. गेल्या चार पिढ्यांना अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या या वाड्याचा रुबाब पोर्तुगीज, इंग्रज व मराठा अशा तिन्ही रियासतींनी अगदी जवळून पाहिलेला आहे. नवी मुंबईतील हा वाडा म्हणजे उत्तम वास्तूचे प्रतीक आहे. वाड्याला आतून असलेल्या लाकडी खांबांवर कोरीव नक्षीकाम केलेले असून खिडक्या व दरवाजे सागवान लाकडाचे असल्याने आजही शाबूत आहेत. तसेच वाड्यातील लाकडी कपाटे एखाद्या सिनेमातल्या सेटप्रमाणे भासत असल्याने काही वर्षांपूर्वी वाड्यात मराठी सिनेमाचे शूटिंगदेखील झाले होते. विशेष म्हणजे, १९८०-८५ च्या पूर्वी तांडेल वाड्यात लहान-मोठी असे ५० हून अधिक सदस्य राहत होते. शहराचा विकास होत गेला तशी कुटुंबांतील प्रत्येक सदस्य इतरत्र राहू लागले. मात्र, असे असताना वाडा काही रिकामा झाला नाही. आजही त्या वाड्यात तांडेल कुटुंबातील विजया तांडेल (सेवानिवृत्त शिक्षिका) वास्तव्याला आहेत.
------------------------------------------------------
वाड्याची विविध वैशिष्ट्ये
- वाड्यात प्रशस्त अशी १०० हून अधिक माणसे बसतील, अशी ओटी आहे. आजही ही ओटी एकदम सुस्थितीत आहे. त्यामुळे इतरही धार्मिक कार्यक्रमावेळी भजनाचे कार्यक्रम येथे होतात. तसेच तांडेल वाड्यात भाद्रपद महिन्यातील गणपती उत्सवानिमित्ताने अख्खे तांडेल कुटुंब एकत्र जमतात.
- वाडा बांधण्यात आला, त्यावेळी दोन विशेष खोल्या बांधल्या होत्या. त्यात एका ठिकाणी गणपती उत्सवासाठी, तर दुसऱ्या खोलीत बाळंतिणीसाठी व्यवस्था केली आहे. तसेच वाड्यात तब्बल लहान-मोठ्या अशा ४० खोल्यांमुळे त्याचे वेगळेपण अधोरेखित होत आहे.
-------------------------------------
‘शिलोतरीदार’ म्हणून ओळख
करावे गावातील बाळ तांडेल, तसेच गणपत तांडेल या तांडेल बंधूंनी व्यापार उदिमातही नावलौकिक मिळवला. बेलापुरात दोन हजार एकर जागेत मिठाचे उत्पादन घेतले जात असे. मिठाचे उत्पादन तसेच विक्रीसाठी कलेक्टर महसूल विभाग ठाणे यांचा परवाना लागत असे. हा परवाना काळे मीठ व पांढरे मीठ अशा दोन प्रकारचा असे. इ.स. १७८० च्या ईस्ट इंडिया कंपनीच्या बेलापूर फॅक्टरीतील रिचर्ड प्राईसच्या नोंदीनुसार मारवाडी, पारसी, मुसलमान व ब्राह्मण यांचीच या व्यवसायात मक्तेदारी होती; परंतु करावे गावाच्या सुपुत्रांनी ही मक्तेदारी कायमचीच मोडली होती.
----------------------------------
तांडेल वाडा हा आमच्या पणजोबांनी बांधला होता. सध्या वाड्याची काहीअंशी दुरवस्था झाली आहे, पण आजही याच वाड्यात गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या वाड्यात आमच्या चार पिढ्यांच्या आठवणींचा ठेवा आहे.
- अॅड. विलास तांडेल, सदस्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.