विणीच्या हंगामात नवरंग पक्ष्याचा चार महिने मुक्काम

विणीच्या हंगामात नवरंग पक्ष्याचा चार महिने मुक्काम

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : पावसाळ्यात देश-विदेशातील पक्ष्यांचे आगमन झाले असून, यापैकी एक असणाऱ्या नवरंग (Indian Pitta) पक्ष्याचा किलबिलाट कानी पडत आहे. तांबडा, पिवळा, हिरवा, निळा अशा विविध रंगांच्या छटांनी मोहून टाकणारा पक्षी दक्षिण भारतातून ठाण्यात विणीच्या हंगामात येतो. दाट झाडी, जंगल भागात फिरताना याची शिळ कानी पडल्यावर नवरंगचे हमखास दर्शन पक्षीप्रेमींना घडत आहे.
पावसाने ठाणे जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. वातावरणात आल्हादायक गारवा सर्वजण अनुभवत असताना, निसर्गाच्या कुशीत विसावा घेण्यासाठी देश-विदेशातून स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. चातक, पावशा, तिबोटी खंड्या आदींबरोबर नवरंग पक्ष्याने आपले पंख पसरवले आहेत. साधारण साळुंकीच्या आकाराचा हा पक्षी मनमोहक दिसतो. या पक्ष्याला नऊ रंगांचा वर्षाव निसर्गाने केल्यामुळे त्याला ‘नवरंग’ या नावाने ओळखले जाते. भगवा, पिवळा, हिरवा, निळा, काळा, पांढरा, पोपटी, किरमिजी या नऊ रंगांची उधळण पक्ष्याच्या पिसांवर असते. दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आदी भागातून विणीच्या हंगामात नवरंग उत्तरेकडे झेपावत असल्याची माहिती पक्षी अभ्यासक हिमांशू टेंभेकर यांनी दिली.
जंगलात भटकंती करताना ‘व्हीट-ट्यू’ असा आवाज ऐकू आला की आसपासच्या भागात नवरंग असल्याचे समजावे. सकाळी आणि संध्याकाळी पक्ष्यांचा किलबिलाट अधिक असतो. झाडी-झुडपात राहणे पसंत करणाऱ्या या पक्ष्याचा जून ते ऑगस्ट महिना विणीचा हंगाम असतो. यात नर व मादी दिसायला सारखेच असतात. गवत, झाडाची मुळे, काड्या आदीपासून बनविलेल्या घरट्यात पक्ष्याची मादी चार ते सहा अंडी देते. विविध प्रकारचे कीटक हे त्याचे मूळ खाद्य असल्याचे पर्यावरण अभ्यासक माधव आठवले म्हणाले.
.............................
बारवी धरण परिसरातील झाडी-झुडपात अनेक पक्ष्यांचा निवारा आहे. पावसाळ्यात लांबचा प्रवास करून येणारे तिबोटी खंड्या, कोकीळ कुळातले पक्षी पावशा, चातक, भारतीय कक्कू आदी पक्षी किलबिलाट करतात.
- माधव आठवले, पक्षी अभ्यासक
..........................................
दक्षिण भारतातून येणारा नवरंग पक्षी पश्चिम घाट, महाराष्ट्र, मध्य भारत परिसरात याच काळात स्थलांतर करतो. मे ते सप्टेंबर या काळात पाहुणचार करून नंतर मायदेशी परततो. मुख्यतः दाट जंगलांतला हा पक्षी शहरात म्हणजे ठाणे, मुंबईच्या दाट झाडीच्या पट्ट्यात हमखास दिसून येतो.
- हिमांशू टेंभेकर, पक्षी अभ्यासक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.