रानभाज्यांतून ग्रामीण अर्थकारणाला चालना

रानभाज्यांतून ग्रामीण अर्थकारणाला चालना

Published on

वसई, ता. ८ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात बांबू हस्तकलेतून अनेक महिलांना रोजगार मिळतो. राज्यपाल रमेश बैस यांनी महिलांचे कौतुक करत बांबूपासून तयार केलेल्या उत्पादनांचे कौतुक केले आहे. तसेच बांबू लागवडीसाठी शासकीय दरबारी हाक दिली आहे. त्यातच आता डोंगराळ भागातून पावसाळी रानभाज्यांना बाजार उपलब्ध झाला आहे. महिलांना उत्पन्नाचे साधन मिळाल्याने त्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत असल्याने ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला चालना मिळत आहे.

पालघर जिल्हा आदिवासीबहुल क्षेत्र असून येथील नागरिक हे डोंगरावर जाऊन पौष्टिक व गुणकारी, औषधी भाजीपाला थेट शहरात आणून विक्री करत असतात. पावसाळा सुरू असताना या हिरव्यागार भाज्या खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आदिवासी महिलांना उत्पन्न मिळत आहे. शेवळी, अंबाडी, कोरळ, नाली भाजी, खडक अंबाडी, रान अंबाडी, आलवा, कोसबा, पेंढारा, हिरवी उंबरा, सुळशी, चाईचे बोखे, बाफली, कसत कुबणा, टाकळा, लोत करडू यासह विविध रानभाज्या बाजारात येऊ लागल्या आहेत.

आहारात या भाज्यांना पावसाळ्यात महत्त्व दिले जात आहे. या भाज्यांची एक जुडी २० रुपयांना विकली जात आहे. मेहनत, कष्ट करून आणण्यात आलेल्या भाज्यांना व्यवसायाची संधी मिळावी म्हणून वसई समाज मंदिर ट्रस्ट, वसई-विरार महापालिका व वसई तालुका पत्रकार संघाने एक प्रयोग केला. श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून एकदिवसीय राजभाज्यांचे प्रदर्शन समाज उन्नती मंदिर सभागृहात भरवण्यात आले होते. एकीकडे महिला फूटपाथ, रस्त्याच्या कडेला किंवा बाजारात मिळेल त्या जागेत बसून भर पावसात व्यवसाय करताना त्यांना प्रदर्शनातून विक्रीसाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.

आदिवासी महिला मेहनतीने रानभाज्या आणत शहरात विक्री करतात. त्यांना एकाच ठिकाणी जागा मिळावी, यासाठी महापालिका प्रयत्न करेल. पावसाळी रानभाज्या या आरोग्यासाठी गुणकारी असून, महिला हा व्यवसाय करत आहेत, हे कौतुकास्पद आहे.
- अनिलकुमार पवार, आयुक्त

रानभाज्यांचे प्रदर्शन भरवल्याने अनेकांना एकाच ठिकाणी भाजी खरेदी करण्याची संधी मिळाली. महिलांना एकाच ठिकाणी उत्पन्नाचे साधन मिळाले. त्यांच्या कष्टाचे चीज व्हावे, यासाठी एकाच छताखाली आणले तर विक्री उत्तम होऊ शकते.
- नितीन म्हात्रे, केवल वर्तक अध्यक्ष/विश्वस्त

रानभाजी प्रदर्शनात यंदा चांगली विक्री झाली. या भाज्या पावसाळ्यात उगवत असल्याने त्याला मागणी असते. या पैशांतून कुटुंबाला आर्थिक हातभार लागतो.
- लता पागी, रानभाजी विक्रेती

अंबाडी, कोरळ, शेवळी व अन्य रानभाज्या ग्राहक पावसाळ्यात खरेदी करतात. कंटवलीला खूप मागणी असते, मात्र अद्याप ती बाजारात आलेली नाही. या भाजीला अधिक मागणी असल्याने पैसे चांगले मिळतात.
- बेबी लांगी, भाटपाडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.