साहेबांना त्रास देऊ नका, परत या!

साहेबांना त्रास देऊ नका, परत या!

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : तुम्हाला वाटत असेल माझ्यासारखा माणूस पक्षातून बाहेर ढकलल्याने पक्ष खूप वाढणार आहे. मी तर बाहेर जाईनच, शिवाय जयंत पाटील यांनाही घेऊन जाईन; मात्र तुम्ही परत या, साहेबांना त्रास देऊ नका, अशी भावनिक साद जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला घातली आहे. शनिवारी (ता. ८) सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आनंदनगर चेक नाका येथे आगमन झाले. या वेळी जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे आणि फटाक्यांच्या गजरात जोरदार स्वागत केले. या वेळी आव्हाड बोलत होते.
बापाला बाप नाही म्हणायचे आणि शेजारच्याला बाप म्हणायचे, अशी पद्धत सुरू झाली आहे. मला सत्तेचे आणि पैशाचे राजकारण करायचे नसल्याचेदेखील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या वेळी सांगितले. या वेळी कार्यकर्त्यांनी ‘आम्ही सारे साहेबांसोबत, देशाचा बुलंद आवाज शरद पवार, देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो’ अशी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केल्यानंतर पवार यांनी नाशिकच्या दिशेने कूच केले. या वेळी ठाण्यातील कार्यकर्तेही दौऱ्यामध्ये सहभागी झाले. या वेळी ठाणे पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, शानू पठाण, राष्ट्रवादीचे ठाणे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

.....................................
अजित पवार गटाचे शक्तिप्रदर्शन
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर शनिवारी प्रथमच ठाणे शहरात अजित पवार गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शहराध्यक्ष आनंद परांजपे, माजी गटनेते नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी आज आनंदनगर चेक नाका येथे जमा होऊन जोरदार घोषणाबाजी करत शक्तिप्रदर्शन केले. ‘एकच वादा अजितदादा, राष्ट्रवादी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची’ अशा घोषणा देत, एक प्रकारे जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला. कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हे नाशिक दौऱ्यावर जात आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही जमलो आहे. आम्ही कोणीही राष्ट्रवादी सोडलेली नाही. आमचे नेते अजितदादा असून शरद पवार हे दैवत आहेत, असे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.