उच्चभ्रू नगरीकडे खारघरची वाटचाल

उच्चभ्रू नगरीकडे खारघरची वाटचाल

खारघर, ता. १० (बातमीदार) : सिडकोच्या व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती या गृहप्रकल्पाजवळ असलेल्‍या खुटारी, रोहिंजण गावातील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी बिल्डर्सनी खरेदी केली आहेत. या जमिनीवर अप्पर खारघर शहराची निर्मिती केली जात आहे. विशेष म्हणजे हा भाग डोंगरालगत आणि अमनदूत मेट्रो स्थानकालगत असल्‍याने याठिकाणी टू, थ्री बीएचकेची घरे उभारली जात आहेत. त्‍यामुळे मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्सप्रमाणे उच्चभ्रू वसाहत म्‍हणून भविष्‍यात परिसराची ओळख निर्माण होऊ शकते.
सिडकोने खारघर शहरात एकूण चाळीस सेक्टरची निर्मिती केली आहे. सेक्टर ३६ मध्ये व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती हे गृहप्रकल्प आणि सेक्‍टर ३८ मध्ये सत्य साई संजीवनी रुग्‍णालय आहे. त्‍याच्या मागे एकटपाडा, खुटारी, किरवली आणि रोहिंजन आदी गावातील शेतकऱ्याची जमीन आहे. पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यावर या परिसरातील गावांचा पनवेल महापालिकेत समावेश करण्यात आला. सिडकोने याठिकाणी सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्स उभारले असून लवकरच कार्पोरेट पार्कही विकसित करणार आहे. सरकारने तुर्भे-खारघर भुयारी मार्ग उभारणार असल्याची घोषणा केल्‍याने निवास तसेच व्यावसायिक दृष्‍टिकोनातून खारघरला प्राधान्य दिले जात आहे.
नवी मुंबई मेट्रो मार्गावरील अमनदूत मेट्रो स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतकऱ्याच्या जमिनीकडे बिल्डरांनी लक्ष केंद्रित करून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली आहे. परिसरात ५०० एकरहून अधिक जमीन असून ४०-५० माळ्याचे टोलेजंग टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. या टॉवरमध्ये टू आणि थ्री बीएचकेची घरे असून जीम, सभागृह, स्वीमिंग पूल, क्लब, सिनेमाघर, सर्व सुविधायुक्त मार्केट, मंदिर, चार्जिंग पॉइंटसह वाहनतळ उभारले जात आहे. घरांच्या किमतीही कोट्यवधीच्या घरात आहेत. साहजिकच अप्पर खारघर म्हणून विकसित ही वसाहत उच्चभ्रू नगरी म्हणून ओळखली जाणार आहे. परिसरातील बहुतांश शेतकऱ्याची जमिनी बिल्डरने खरेदी केल्‍या असून चांगला मोबदलाही दिल्‍याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.

रस्ते बांधा, वाढीव एफएसआय मिळेल
खुटारी, रोहिंजन परिसरातील शेतकऱ्यांची जमीन खरेदी केल्यावर बिल्डरकडून इमारत उभारण्याची कामे सुरू आहेत. पनवेल महापालिकेने नव्या गृहप्रकल्पातील नागरिकांची गरज ओळखून पनवेल-मुंब्रा मार्गाला जोडण्यासाठी दहा कोटी रुपये खर्चून पस्तीस मीटर रुंदीचा रस्ता निर्माण करण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमीन संपादनाची प्रक्रिया, काहींचा विरोधामुळे प्रकल्‍पास विलंब होतो, हे लक्षात घेउन महापालिकेने परिसरातील बिल्डरवर्गालाच एक ऑफर दिली आहे. खारघर ते रोहिंजन टोलनाकादरम्यान जवळपास तीन किमी काँक्रिटचा रस्ता तयार करा, पालिका तुम्हाला दीड आणि तीन वाढीव एफएसआय देईल, असे महापालिकेने कबूल केल्‍याने खारघरमध्ये रस्त्याचे काम जोरात सुरू आहे.

रस्‍त्‍यामुळे वेळ, इंधनाची बचत
उलवे, सीबीडी-बेलापूर आणि खारघरमधील नागरिकांना मुंब्रा, कल्याण, ठाण्याकडे जाण्यासाठी खारघर सेंट्रल पार्ककडून शीघ्रकृती दलाच्या बटालियनजवळून जाणाऱ्या रस्त्याला वळसा घालून जावे लागते. सेक्टर ३६ मधून रस्ता जाणार असल्यामुळे वेळ तसेच इंधनाची बचत होईल. तसेच रस्त्याचा कडेला हॉटेल व इतर व्यवसाय करणाऱ्यांनाही प्रोत्साहन मिळेल.

नागरी सुविधांवर भर
व्हालीशिल्पच्या बाजूला डोंगरालगतची जमीन ग्रीन झोनमध्ये समाविष्‍ट आहे. त्‍यामुळे याठिकाणी उभारल्या जाणाऱ्या इमारतीला दीड एफएसआय तर खुटारीगाव आणि रोहिंजन गावालगत उभारल्या जाणाऱ्या इमारतीला तीन एफएसआय मिळणार आहे. शिवाय पनवेल महापालिका पाणी, वीज आदी नागरी सुविधा उपलब्ध करून देणार असल्यामुळे प्रकल्पाला चालना मिळाल्याचे काही बिल्डर्सनी सांगितले.

खुटारी, रोहिंजन परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा आजही प्रकल्‍पाला
विरोध आहे. इमारत आणि रस्ते बांधकामांना विकास आराखडा मंजूर न करताच कामे सुरू करण्यात आली आहेत. काही बिल्डर जमिनीसाठी शेतकऱ्यांवर दबाव आणत आहे.
- विश्वास म्हात्रे, ग्रामस्थ, खुटारीगाव

खारघर व्हॅली शिल्प ते दहिसर टोल नाका दरम्यान २.८० किलोमीटर सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता बांधकाम व्यावसायिक तयार करणार आहेत. त्या बदल्यात त्‍यांना पनवेल महापालिकेकडून वाढीव एफएसआय देण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. परिसरातील विकासकामे नियमानुसारच सुरू आहेत.
- संजय हिमगिरे, नगर अभियंता, पनवेल महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com