बनावट सह्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार

बनावट सह्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार

भाईंदर, ता. १० (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या बीएसयूपी योजनेत घर देण्याचे प्रलोभन दाखवून बनावट शिधापत्रिका, तसेच वीज देयके बनवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आता या योजनेतील तात्पुरती घरे देण्यासाठी महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित यांच्या नावे बनावट सह्या करून वाटपपत्रे तयार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी लवकरच स्वतंत्रपणे गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

काशी-मिरा येथील जनता नगर आणि काशी चर्च या दोन झोपडपट्ट्यांमधील सुमारे चार हजार कुटुंबांना पक्की घरे देण्यासाठी महापालिकेने बीएसयूपी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ट करून घर मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून लोकांची लाखो रुपयांची फसवणूक करणारी एक टोळी उघडकीस आली आहे. मात्र काही जणांनी काशी-मिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर हा घोटाळा प्रकाशात आला. याप्रकरणी सात जणांना अटक झाली आहे. आरोपी घरे मिळवून देण्यासाठी बनावट शिधापत्रिका व वीज देयके तयार करण्याचे काम करत असत. आता महापालिकेच्या अभियंत्यांच्या बनावट सह्या करून तात्पुरत्या घरांचे वाटप पत्रेदेखील बनवल्याचे उघड झाले आहे.

खात्री पटवण्यासाठी बनावट पत्र
ज्यांना घरे देण्याचे प्रलोभन दाखवले, त्यांच्या नावे या तात्पुरत्या घरांची बनावट वाटपपत्रे तयार करून त्यावर विद्यमान शहर अभियंता दीपक खांबित यांच्या बनावट सह्या केल्या. ही वाटपपत्रे केवळ फसवणूक होत असलेल्यांची खात्री पटवण्यासाठी तयार केली जात होती. प्रत्यक्षात त्यांना तात्पुरत्या घरांचा ताबा देण्यात आलेला नाही, अथवा पालिकेच्या यादीतही त्यांची नावे नाहीत. आपल्या नावे बनावट सह्या करून वाटप पत्रे तयार केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दीपक खांबित यांनी दिली.

लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची फेरपडताळणी
चार हजार लाभार्थ्यांपैकी महापालिकेने आतापर्यंत ४७३ लाभार्थ्यांना पक्क्या घरांचे वाटप केले आहे. आता घरे मिळालेल्या या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची फेरपडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता खांबित यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com